Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाराष्ट्रात तौत्के चक्रीवादळाचा हाहा:कार

रायगड जिल्ह्यात 7 हजार 866 रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविले

मुंबई 17 मे :- अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या तोक्ते चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवायला सुरुवात झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांसह अनेक ठिकाणी याचा फटका बसला आहे. कोकण किनारपट्टीला समांतर वाटचाल करत असलेल्या तौत्के चक्रीवादळानं गती घेतली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत आहे. तर काही ठिकाणी झाडांची पडझडही पाहायला मिळते. तसेच अनेक ठिकाणी बत्तीही गुल झाली आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या राजापूर, सिंधुदुर्ग, आंबोळगड यांसह इतर गावांना चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. रत्नागिरीतील 104 गावांमधील 800 ते 1 हजार घरांची पडझड झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

रत्नागिरीसह सिंधुदुर्गातील बहुतांश गावात वीज पुरवठा खंडित झाला आहे. रत्नागिरी, राजापुर, देवगड, मालवण, वेगुर्ले या भागातील बत्ती गुल झाली आहे. काही ठिकाणी काल दुपारपासूनच वीज पुरवठा खंडित झाला आहे. तौत्के चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवरून आतापर्यंत 6 हजार 540 नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

साताऱ्यालाही वादळाचा फटका, घरांचं नुकसान, महाबळेश्वरमधील वीज पुरवठा खंडित

तोक्ते चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीसह सातारा जिल्ह्यालाही बसल्याचं चित्र दिसत आहे. काल रात्रीपासून जोरदार वाऱ्यासह पावसाने चांगलेच झोडपून काढले. रात्रभर कोसळत असलेल्या पाऊसामुळे अनेकांचे हाल झालेच शिवाय अनेकांच्या घरांचेही नुकसान झाले. या चक्रीवादळाचा तडाखा सातारा शहराबरोबर महाबळेश्वर, पाचगणी, वाई आणि कोयना पाटण भागालाही मोठ्या प्रमाणात बसला. महाबळेश्वरात तर गेल्या दोन दिवसापासून वीज पुरवठा खंडित झाला आहे. तर वीज नसल्यामुळे दोन दिवसांपासून महाबळेश्वरमधील नागरिकांना पाण्यापासूनही वंचित राहावे लागले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मुंबईतील स्थिती काय?

सध्या तौत्के चक्रीवादळ हे मुंबईपासून सुमारे 150 किमी अंतरावर आहे. तौत्के चक्रीवादळाचा मुंबईला धोका नाही, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. मात्र हे चक्रीवादळ मुंबईनजीकच्या समुद्रातून जाणार असल्याने सध्या त्याचा प्रभाव सर्वत्र पाहायला मिळत आहे. मुंबईत सध्या वेगवान वाऱ्यासह जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे.

Comments are closed.