दहा वर्षे सेवा पूर्ण, तरीही स्थायीकरणाचा प्रश्न अनुत्तरीत; अहेरीत आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन
शासनाच्या विलंबामुळे अस्वस्थता निर्माण झाली असून, आंदोलन अधिक तीव्र झाल्यास तालुक्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत....
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: अहेरी तालुक्यातील आरोग्य सेवा पुन्हा ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या दीर्घकालीन मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने 19 ऑगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
या कर्मचाऱ्यांपैकी अनेकांनी सलग दहा वर्षांहून अधिक काळ सेवा बजावली असून, शासनाने 14 मार्च 2024 रोजी काढलेल्या निर्णयात अशा कर्मचाऱ्यांचे मंजूर पदावर तीस टक्के समायोजन करून स्थायीकरण केले जाईल असे स्पष्ट केले होते. मात्र दीड वर्षाचा कालावधी उलटूनही त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे आपल्या सेवेला न्याय मिळावा, स्थिरता मिळावी आणि नियमित भरतीप्रमाणे हक्काचे मानधन मिळावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन उभारले आहे.
आंदोलनामुळे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाखालील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि पथकांच्या सेवा विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसू शकतो. स्थानिक स्तरावर नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे की, जर हा प्रश्न निकाली निघाला नाही तर आरोग्य व्यवस्थेत गोंधळ उडेल आणि गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सलग दहा वर्ष सेवा दिल्यानंतरही जर आम्हाला स्थायी पदावर घेण्यात आले नाही, तर आयुष्यभर असुरक्षिततेच्या छायेत राहावे लागेल. शासनाने दिलेला निर्णय कागदावरच राहिला असून, आम्हाला हक्काचा न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील.
Comments are closed.