Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ग्रामसभांचे पाच वर्षापासून प्रलंबित तेंदूपत्ता रॉयल्टी रक्कम मिळणार : जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांनी दिले चौकशीचे आदेश

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २८ मार्च : सन २०१७ मध्ये एटापल्ली तालुक्यातील गट्टा, जांभीया, गर्देवाडा, वांगेतुरी, जवेली,उडेरा व अहेरी आणि भामरागड तालुक्यातील अनेक संयुक्त ग्रामसभांच्या युनिटचे तेंदुपत्ता लिलावाव्दारे कंत्राटदारांना कंत्राट देण्यात आले. मात्र, पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटुनही तेंदूपत्ता रॉयल्टीची रक्कम कंत्राटदारांनी ग्रामसभांना दिलेली नसल्याबाबत शेतकरी कामगार पक्षातर्फे जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगाने जिल्हाधिकार्‍यांनी गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना सदर राॅयल्टी रक्कम तात्काळ मिळवून देण्यासाठी योग्य कारवाई करुन अहवाल सादर करावा असे आदेश दिले आहेत.

संबंधित ग्रामसभांनी कंत्राटदारांना संपर्क केल्यानंतर आणि प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही या थकीत राॅयल्टी रक्कमेबाबत कोणतीही कारवाई झाली नव्हती. ग्रामसभांची राॅयल्टी मोठ्या प्रमाणावर थकीत ठेवणारे तेंदूपत्ता कंत्राटदार हे बाहेर जिल्ह्यातील असल्याने प्रतिसाद देत नाहीत. अनेकदा ते वेगवेगळी नावे बदलून कंत्राट घेतात. जिल्ह्यातील कंत्राटदार ओळखी आणि स्थानिक असल्याने उशिरापर्यंत रक्कम ग्रामसभांना अदा करतात. मात्र जिल्ह्याबाहेरील कंत्राटदार कोणत्याही कारवाईला प्रतिसाद देत नाहीत. मागील हंगामात एका कंत्राटदाराची गडचिरोली वन नाक्यावर वाहने अडविल्यानंतरही थकीत राॅयल्टी रक्कम वसूल होवू शकली नव्हती. प्रशासनानेही याबाबत हात वर केले होते. त्यामुळे ४ फेब्रुवारी रोजी शेतकरी कामगार पक्षातर्फे मागील पाच वर्षांपासून कंत्राटदारांकडून थकीत राॅयल्टी रक्कम ग्रामसभांना वसूल करुन द्यावी यासाठी सदर तक्रार जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांच्याकडे करण्यात आली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्हाधिकार्‍यांनी सदर प्रकरणी दखल घेतल्याने आता जिल्हाभरातील ग्रामसभांची थकीत आणि चालू हंगामातील राॅयल्टी रक्कम राॅयल्टी वसूल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच येत्या हंगामात ग्रामसभांची राॅयल्टी थकीत राहू नये यासाठी प्रशासनाने योग्य उपाययोजना कराव्यात यासाठीही शेतकरी कामगार पक्षातर्फे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे शेतकरी कामगार पक्षाने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.