Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आपत्तीचा सामना करण्यासाठी जिल्हा यंत्रणा सज्ज

जिल्हाधिका-यांकडून एसडीओ, तहसीलदार व विभाग प्रमुखांचा आढावा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

चंद्रपूर, 21 मे- येत्या काही दिवसात मान्सूनचे आगमन होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्याला अतिवृष्टी, पूर परिस्थितीचा इतिहास आहे. अशा आपत्तीच्या काळात पूरपिडीतांना दिलासा देण्यासाठी ग्रामस्तर, तालुकास्तर तसेच जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांना आवश्यक निर्देश देण्यात आले असून संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे, असे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सांगितले.

नियोजन सभागृह येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या वतीने आयोजित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व सर्व विभाग प्रमुखांचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, मनपा आयुक्त विपीन पालीवाल उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आपत्तीच्या काळात सर्वांनी अतिशय जबाबदारीने आणि गांभिर्याने काम करावे, असे सांगून जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, जिल्हा स्तरावरील बैठकीनंतर लगेच प्रत्येक तालुकास्तरावर संभाव्य आपत्तीसंदर्भात बैठक घ्यावी. यात नदीकाठावर असलेल्या पूरप्रवण गावांची यादी करणे, तेथे प्रत्यक्ष भेटी देणे आणि उपाययोजना आदीबाबत सुक्ष्म नियोजन करावे. आपापल्या स्तरावरील आपदा मित्र, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, स्वयंसवेक यांची नावे आणि संपर्क क्रमांक अपडेट ठेवावे. जेणेकरून आपत्तीच्या वेळी त्वरीत संपर्क करणे सोयीचे होईल. चंद्रपूर शहराची पूर परिस्थिती हाताळण्यासाठी महानगर पालिका प्रशासन, संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलिस विभाग आदींनी समन्वयाने विशेष टीमचे गठन करावे. इरई धरणाच्या संबंधित अधिका-यांसोबत नियमितपणे संपर्कात राहावे.

पुढे जिल्हाधिकारी म्हणाले, अतिवृष्टीमध्ये संपर्क तुटणारे तालुके किंवा गावांमध्ये आरोग्य यंत्रणा, औषधीसाठा, खाद्यसामुग्री मुबलक प्रमाणात राहील, याची दक्षता घ्यावी. संभाव्य आपत्तीबाबत तात्काळ वरिष्ठ अधिकारी, संबंधित विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांना अवगत करावे. आपत्तीच्या काळात उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी नागरिकांना अवगत करण्यासाठी स्वत:च्या वाहनावर माईक सिस्टीम लावण्याचे नियोजन करावे. पूर पिडीतांना स्थलांतरीत करण्यासाठी आपापल्या क्षेत्रातील निवारा गृह, समाजमंदीर, सभागृह, शाळा आदी ठिकाणांची अद्ययावत माहिती तसेच या ठिकाणी पुरेशी विद्युत व्यवस्था, महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह व इतर बाबी उपलब्ध करून द्याव्यात. आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी तालुक्यांना पुरविण्यात आलेले साहित्य सुस्थितीत आहे की नाही, त्याची खातरजमा करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी गौडा यांनी दिल्या.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.