गडचिरोली जिल्हा प्रशासनाची धडपड फळाला आली — अतिदुर्गम वाडसकला गावातील गर्भवती मातेचा जीव वाचवण्यात यश
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात आरोग्य सेवा पोहोचवणे ही एक अत्यंत आव्हानात्मक बाब असताना, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या समन्वित आणि सतर्क प्रयत्नांमुळे एटापल्ली तालुक्यातील वाडसकला या दुर्गम गावातील एका गर्भवती मातेचा जीव वेळेवर उपचार देऊन वाचवण्यात यश आले आहे. या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
२७ मे २०२५ रोजी ही धक्कादायक आणि सकारात्मक शेवट असलेली घटना समोर आली. वीणा वासुदेव पोटवी (वय २२) या तरुणीची प्रसूतीची अपेक्षित तारीख २१ मे होती. मात्र, त्या स्वतःहून रुग्णालयात दाखल होण्यास नकार देत होत्या. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या मनात रुग्णालयाबाबत अविश्वास होता, जो आरोग्य सेवकांना सातत्याने जाणवत होता.
आरोग्य पथकाच्या सातत्यपूर्ण भेटी..
’90-42 दिवस मिशन’ अंतर्गत मागील एक महिन्यापासून प्राथमिक आरोग्य पथक जरावांडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशिल घोनमोडे आणि आशा सेविका मीना आतला यांनी वीणाच्या घरी जाऊन नियमित आरोग्य तपासणी सुरू ठेवली होती. १५ मेपासून आरोग्य सेविका सुनंदा आतला आणि मीना आतला यांनी दररोज घरी भेट देत वीणाची तब्येत तपासत राहिल्या.
गेल्या काही दिवसांपासून तिच्या पायांवर आणि चेहऱ्यावर सूज येत होती, रक्तदाबही खूप वाढलेला होता. डॉक्टरांनी संभाव्य धोका स्पष्टपणे समजावून सांगूनही कुटुंबीय रुग्णालयात येण्यास तयार नव्हते.
प्रशासन आणि पोलीस यंत्रणेची तातडीची मदत…
शेवटी परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात घेऊन डॉ. घोनमोडे यांनी ही माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण चौधरी यांच्यापर्यंत पोहोचवली. तत्काळ उपविभागीय अधिकारी नमन गोयल, तहसीलदार हेमंत गांगुर्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे आणि गटविकास अधिकारी आदिनाथ आंधळे यांच्याशी संपर्क साधून मदत मागवण्यात आली.
जरावांडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मोहिते, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती चव्हाण, श्रीमती इंगोले, एस. बी. तेलामी आणि महसूल सेवक सोपान उईके हे सर्व तातडीने वाडसकला येथे पोहोचले. त्यांनी मातेची समजूत घालून तिच्या कुटुंबियांना मन वळवले. आवश्यक आर्थिक मदतही देण्यात आली.
सुरक्षित प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात हलवले…
अखेर वीणाला प्राथमिक आरोग्य केंद्र जरावांडी येथे आणण्यात आले. तेथे तिची तपासणी करून आवश्यक प्राथमिक उपचार दिल्यानंतर, पुढील उपचारासाठी तिला गडचिरोली जिल्हा स्त्री रुग्णालयात हलवण्यात आले. यामुळे तिच्या आणि बाळाच्या जीवाला धोका टळला.
‘संस्थात्मक प्रसूती’साठी शासनाची कटिबद्धता…
महाराष्ट्र शासन आणि जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्यातर्फे ‘१०० टक्के संस्थात्मक प्रसूती’ साध्य करण्यासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. यामध्ये जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना, मानव विकास कार्यक्रम अंतर्गत बुडीत मजुरी योजना अशा योजना मातांना आर्थिक व वैद्यकीय मदत पुरवतात.
या घटनेचे महत्त्व..
या घटनेतून दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेतील अडचणी, लोकांमध्ये असलेले आरोग्यसेवेबद्दलचे संकोच आणि स्थानिक प्रशासनाच्या चिकाटीमुळे शक्य होणाऱ्या यशस्वी हस्तक्षेपाची प्रचीती येते. वेळेवर घेतलेल्या या कृतीमुळे एक जीव वाचला आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर जनतेचा विश्वास दृढ झाला.
Comments are closed.