झाडीपट्टी रंगभूमीचा तेजस्वी चेहरा : पौर्णिमा तायडे यांना मानाचा सन्मान
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गोंडपिपरी : झाडीपट्टीच्या समृद्ध आणि जनमानसाशी घट्ट नातं जोडलेल्या रंगभूमीवर आपल्या बहुआयामी अभिनयाने ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री पौर्णिमा तायडे यांचा धाबा येथे पार पडलेल्या भव्य स्नेहसंमेलनात गौरव करण्यात आला. युगचेतना ग्राम विकास बहुद्देशीय संस्था, चंद्रपूर तसेच महाराष्ट्र राज्य मानव अत्याचार निर्मूलन समिती, गोंडपिपरी यांच्या संयुक्त विद्यमाने २२ मार्च रोजी आयोजित या कार्यक्रमात त्यांना ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नाट्य अभ्यासक डॉ. राजकुमार मुसणे होते, तर ज्येष्ठ रंगकर्मी अरविंद झाडे, अमित अलोने, हिरालाल पेंटर, प्रकाश तोहगावकर, श्री. पिपरे, भूमालाताई कुमरे, माजी सरपंच रामदास पिपरे, दीपक सोनारकर, प्रमोद झाडे आदी मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणारी ठरली.
गेल्या दोन दशकांपासून हौशी, व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगभूमीवर सातत्याने कार्यरत असलेल्या पौर्णिमा तायडे यांनी आपल्या अभिनयातून केवळ प्रेक्षकांचे मनोरंजनच नव्हे, तर सामाजिक प्रबोधनही साधले आहे. चरित्रप्रधान, विनोदी आणि खलनायकी अशा विविध भूमिकांमध्ये त्यांनी साकारलेली पात्रे त्यांच्या प्रभावी संवादफेक, आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि सक्षम आंगिक अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुजली आहेत.
झाडीपट्टी रंगभूमीला आपल्या कलेच्या बळावर वेगळी उंची देणाऱ्या या चतुरस्त्र अभिनेत्रीचा सन्मान हा केवळ वैयक्तिक गौरव नसून, संपूर्ण झाडीपट्टी कलाक्षेत्राच्या योगदानाची दखल असल्याचे मानले जात आहे. त्यांच्या या सन्मानाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, ग्रामीण रंगभूमीतील कलावंतांसाठी तो प्रेरणादायी ठरत आहे.

