अहेरीचा राजा’ गणेशाचे शाही विसर्जन जल्लोषात पार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी : ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषात, ढोल-ताशांच्या गजरात आणि हजारो गणेशभक्तांच्या उपस्थितीत अहेरी इस्टेटचा मानाचा ‘अहेरीचा राजा’ रविवारी शाही थाटात विसर्जित करण्यात आला. या मिरवणुकीला माजी पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत अहेरी राजनगरीत भाविकांच्या उत्साहात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. रोजच्या महाआरतींना भाविकांची गर्दी उसळली होती. विसर्जन सोहळ्याच्या सुरुवातीला राजे आत्राम यांनी गणेशमूर्तीवर पुष्पवृष्टी व पूजन करून मिरवणुकीला प्रारंभ केला.
बाभूळगावचे प्रसिद्ध ढोल-ताशे, नागपूरचा डीजे आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर गणेशभक्तांनी नृत्य करत शहरातील प्रमुख मार्गाने मिरवणूक काढली. शेवटी वांगेपल्ली येथील प्राणहीता नदी घाटावर भावपूर्ण वातावरणात ‘अहेरीचा राजा’ला निरोप देण्यात आला.
यावेळी राजे अंब्रीशराव आत्राम म्हणाले, “अहेरीत दहा दिवसांचा गणेशोत्सव उत्साहात व शांततेत पार पडला. विसर्जनावेळी मनाला दु:ख होत असले तरी बाप्पा पुढील वर्षी पुन्हा येतील या आनंदात प्रत्येक भाविक भारावून जातो.” त्यांनी पोलीस विभाग, नगरपंचायत आणि प्रशासनाच्या सहकार्याचे विशेष कौतुक केले.
विसर्जन सोहळ्याला राजपरिवारातील राजमाता राणी रुख्मिणीदेवी, कुमार अवधेशराव बाबा, संतोषजी मेश्राम , प्रविणराव बाबा, वैभव श्यामकुंवर यांच्यासह भाजपा पदाधिकारी, सामाजिक संघटना व हजारो गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिस आणि राजपरिवाराने केलेल्या व्यवस्थेमुळे संपूर्ण सोहळा शिस्तबद्ध व सुरळीत पार पडला.