ड्रोन क्रांती’ची ग्रामीण झेप; गडचिरोलीत दुर्गम शेतीत उतरलं तंत्रज्ञान, उत्पादनवाढीस नवा मार्ग
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, : नक्षलप्रभावित, दुर्गम आणि पारंपरिक शेतीपद्धतींमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आता आधुनिक तंत्रज्ञानाची नवी पहाट उगवत असल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने ‘कृषी ड्रोन’च्या माध्यमातून खते व कीडनाशकांच्या अचूक फवारणीचा पथदर्शी उपक्रम राबवत शेती क्षेत्रात तांत्रिक क्रांतीची नांदी घातली आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे गडचिरोलीच्या जंगलरम्य, पण विकासापासून वंचित राहिलेल्या भागात तंत्रज्ञानाचा प्रवेश झाला आहे. ‘ड्रोन शेती’ ही संकल्पना केवळ शहरी भागापुरती मर्यादित न राहता, आता थेट आदिवासी शेतकऱ्यांच्या बांधावर उतरली आहे, हे या उपक्रमाचे सर्वात मोठे यश ठरते.
पार्श्वभूमी : दुर्गमतेत अडकलेली शेती…
गडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग हा जंगलांनी वेढलेला, डोंगर-दऱ्यांनी व्यापलेला आणि वाहतुकीच्या मर्यादित सुविधांमुळे शेतीसाठी आव्हानात्मक मानला जातो. पारंपरिक पद्धतीने कीडनाशक फवारणी करताना मजुरांची टंचाई, आरोग्याचा धोका आणि वेळेचा अपव्यय या समस्या वर्षानुवर्षे शेतकऱ्यांना भेडसावत होत्या. याच पार्श्वभूमीवर कृषी विभागाने ‘ड्रोन तंत्रज्ञान’ाचा वापर करत शेती अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि शाश्वत करण्याचा नवा मार्ग स्वीकारला आहे.
ड्रोन उपक्रमाची वैशिष्ट्ये : तंत्रज्ञानाची थेट शेतीत एन्ट्री….
या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO) आणि महिला बचत गटांना प्राधान्य देत ड्रोन खरेदीसाठी अनुदान व तांत्रिक मार्गदर्शन देण्यात येत आहे. विशेष म्हणजे, स्थानिक युवक आणि महिलांना ‘ड्रोन पायलट’ म्हणून प्रशिक्षण देऊन रोजगारनिर्मितीचा नवा आयामही निर्माण करण्यात आला आहे. भात हे गडचिरोलीतील प्रमुख पीक असून ‘तुडतुडा’सारख्या घातक कीडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनद्वारे अचूक फवारणी केली जात आहे. पारंपरिक पद्धतीपेक्षा ही फवारणी अधिक जलद, प्रभावी आणि सुरक्षित ठरत असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
संसाधनांची बचत, परिणामकारकता अधिक…
ड्रोन तंत्रज्ञानामुळे शेतीतील संसाधनांचा अपव्यय लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.सुमारे ९० टक्के पाण्याची बचत आणि २५ टक्के कीडनाशकांची बचत होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होण्याबरोबरच पर्यावरणीय समतोल राखण्यासही मदत होणार आहे.तसेच, शेतकऱ्यांना विषारी औषधांच्या थेट संपर्कातून मुक्तता मिळणार असल्याने आरोग्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतो.
‘फिरते ड्रोन केंद्र’ : दुर्गम भागासाठी नवी सुविधा…
गडचिरोलीच्या अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात शेतात पोहोचणे अनेकदा कठीण ठरते. यावर उपाय म्हणून ‘फिरते ड्रोन सेवा केंद्र’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या माध्यमातून ड्रोन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सेवा देणार असून, दुर्गम भागातील शेतकऱ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळणार आहे.
महिलांसाठी नवी दिशा, युवकांसाठी रोजगार…
सन २०२४-२५ मध्ये दोन महिला बचत गटांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान देण्यात आले असून त्यांना ड्रोन चालकाचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण महिलांसाठी स्वावलंबनाचा नवा मार्ग खुला झाला आहे. कृषी विकास अधिकारी किरण खोमणे यांच्या माहितीनुसार, स्थानिक युवकांनाही ड्रोन पायलट प्रशिक्षण देऊन रोजगारनिर्मितीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
प्रशासनाचा विश्वास : ‘परिवर्तनाचा टप्पा’…
“कृषी ड्रोनच्या माध्यमातून शेती अधिक आधुनिक, सुरक्षित आणि कार्यक्षम होईल. दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम परिवर्तनकारी ठरेल,” असे मत सुहास गाडे यांनी व्यक्त केले.त्यांच्या मते, हा उपक्रम केवळ फवारणीपुरता मर्यादित न राहता भविष्यातील ‘हायटेक शेती’चा पाया घालणारा ठरणार आहे.

