एकाच महिलेला दोनदा लुटणारे चोरटे अखेर पोलिसांच्या जाळ्यात
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : चामोर्शी-घोट मार्गावर महिलेला लक्ष्य करून जबरी चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना गडचिरोली पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अटक केली आहे. विशेष म्हणजे, या महिलेकडील मोठी रक्कम चोरट्यांनी अडीच महिन्याच्या अंतराने दोन वेळा हिसकावली होती. पोलिसांच्या चिकाटीने हे प्रकरण उघडकीस आले असून, आरोपींच्या कबुलीनंतर पुढील चौकशी सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १९जून २०२५ रोजी प्रिया विकास मंडल ह्या महिला चामोर्शीवरून घोटकडे जात असताना घोटपासून दोन किलोमीटर अंतरावर हनुमान मंदिराजवळ दोन दुचाकीस्वारांनी त्यांच्या पाठीवरील बॅग हिसकावून पळ काढला होता. त्या बॅगेत तब्बल ₹१,२५,०३९ इतकी रोकड होती. या प्रकरणी घोट पोलिस मदत केंद्रात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याच घटनेनंतर अवघ्या अडीच महिन्यांत, दि. ५सप्टेंबर रोजी पुन्हा मंडल कुटुंबातील उषा मंडल या महिला गणपूरहून चामोर्शीकडे जात असताना गणपूरजवळच दोन हेल्मेटधारी दुचाकीस्वारांनी त्यांच्या पाठीवरील बॅग हिसकावली. या वेळेस त्यांच्याकडे असलेली रोकड ₹ १,३४,०३४ इतकी होती. सलग दोन वेळा त्याच कुटुंबावर झालेल्या लुटीमुळे पोलिस यंत्रणा सावध झाली.
या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि चामोर्शी पोलिस ठाण्याचे स्वतंत्र दोन पथक तयार केले. तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. अखेर शिताफीने मलेझरी (ता. मुलचेरा) येथील शशांक संजय दुर्गे (२७) आणि राजा तोताराम कोरडे (२५) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली.
दोन्ही गुन्ह्यांतील लुटलेली रक्कम हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू असून, या आरोपींनी याच पद्धतीने आणखी किती लुटमारी केली आहे, याचा तपास पोलिस करत आहेत. पुढील तपास चामोर्शीचे सपोनि सुमित बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश आणि अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अरुण फेगडे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि भगतसिंग दुलत, पोहवा सतीश कत्तीवार, नापोअं धनंजय चौधरी, पोअं राजू पंचफुलीवार, शिवप्रसाद करमे आणि चापोअं दीपक लोणारे यांच्या पथकाने केली.