देशभरातील पर्यटकांचे आकर्षण – कमलापूर हत्तीकॅम्प
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी (गडचिरोली) दी.12 : कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावातील मठात १९९२ पासून वास्तव्य करणारी ‘माधुरी’ उर्फ ‘महादेवी’ हत्तीण अलीकडे ‘वनतारा’ प्राणी संवर्धन केंद्रात हलविण्यात आल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या घटनेकडे गेले आहे. तिला पुन्हा मठात परत आणण्यासाठी कोल्हापूरमध्ये मोर्चा निघाला. स्थानिक नागरिकांच्या मागण्यांना पाठिंबा वाढू लागल्याने हत्ती संवर्धनाबाबत चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. राज्यातील एकमेव शासकीय हत्तीकॅम्प असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथील हत्तींबाबतही २०२२ साली असाच प्रयत्न झाला होता. येथेले हत्ती वनतारा येथे हलविण्याचा प्रस्ताव आला होता. मात्र स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक संघटना आणि जिल्हावासीयांच्या प्रखर विरोधामुळे तो निर्णय अमलात आला नाही. आज या कॅम्पमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या पर्यटकांची वर्दळ आहे. जंगल पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरत असलेला कमलापूर हत्तीकॅम्प गडचिरोलीच्या नैसर्गिक वारशाचा आणि सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग बनला आहे.
सिरोंचा वनविभागांतर्गत कमलापूर वनपरिक्षेत्र कार्यालयाची स्थापना १९६० मध्ये झाली. १९६२ मध्ये आलापल्लीहून दोन नर आणि दोन मादी असे महालिंगा, रंजित, विमला आणि बसंती हे चार हत्ती येथे आणले गेले. सुरुवातीला त्यांचा ठावठिकाणा कोलामार्का जंगलातील तळावर होता. माहूत, चाराकटर आणि वनाधिकाऱ्यांची निवासव्यवस्था तिथेच करण्यात आली होती. घनदाट सागवान व बांबूची जंगले, स्वच्छ झरे, धबधबे आणि थंड हवामान यामुळे हा परिसर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीचे आकर्षण ठरला. मात्र पाण्याची समस्या निर्माण झाल्याने २००४ मध्ये कॅम्पला दामरंचा रस्त्यालगतच्या तलावाजवळ हलविण्यात आले.
कालांतराने रंजित आणि विमला दिवंगत झाले. महालिंगाचेही निधन झाले. मात्र बसंती आजही जिवंत आहे आणि तिने आपल्या संततीतून वारसा पुढे चालवला आहे. सध्या कॅम्पमध्ये एकूण नऊ हत्ती आहेत. मंगला (जन्म – ७ नोव्हेंबर १९८९) ही महालिंगा व बसंतीची कन्या आहे. अजित (जन्म – ७ जुलै १९९४) हाही त्याच जोडप्याचा पुत्र आहे. राणी (जन्म – १० मार्च २००८) ही अजित व मंगला यांची मुलगी आहे. प्रियंका (जन्म – २४ मे २०१०) ही अजित व बसंतीची कन्या आहे. गणेश (जन्म – २५ ऑगस्ट २०११) हा अजित व मंगला यांचा पुत्र आहे. रुपा २०१८ मध्ये नागझिरा अभयारण्यातून येथे आणली गेली. लक्ष्मी (जन्म – ८ जानेवारी २०२२) ही अजित व प्रियंकाची कन्या आहे. कुसुम (जन्म – २४ मार्च २०२४) ही अजित व राणीची मुलगी आहे.
मागील काही वर्षांत कृष्णा, आदित्य, सई आणि अर्जुन या चार हत्तींचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी आदित्य, सई आणि अर्जुन ही तीनही पिल्ले ‘हर्पिस’ आजारामुळे मृत्युमुखी पडली होती. कृष्णाचा मृत्यू वृद्धापकाळाने झाला. कॅम्पमध्ये पाच माहूत, चार चाराकटर आणि दहा रोजंदारी मजुरांवर हत्तींची देखभाल सोपवलेली आहे. मात्र कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी पद अद्याप रिक्त आहे. दरमहा बाहेरील पशुवैद्य हत्तींची आरोग्य तपासणी करतात. वाढत्या पर्यटन क्षमतेचा विचार करून पायाभूत सुविधा उभारणीचे प्रस्ताव शासनाकडे सादर झाले आहेत. ११ ऑगस्ट रोजी पशुवैद्यकीय अधिकारी भरतीसाठी मुलाखत पार पडली आहे.
कोल्हापूरच्या माधुरी हत्तीण प्रकरणामुळे हत्ती संवर्धनाबाबत जनजागृतीचे आणि भावनिक नाळ जपण्याचे महत्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. कमलापूर कॅम्प हा फक्त पर्यटन स्थळ नाही, तर गडचिरोलीच्या जंगल वारशाचा, पर्यावरणीय संतुलनाचा आणि स्थानिकांच्या अभिमानाचा जिवंत पुरावा आहे. येथेले हत्ती, त्यांचा इतिहास आणि पिढ्यानपिढ्यांचा वारसा यामुळे कमलापूरचे नाव देशभरातील पर्यावरण प्रेमींमध्ये आणि पर्यटकांच्या नकाशावर सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे.
Comments are closed.