आलापल्लीमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार ; पर्यावरण रक्षणासाठी पत्रकारांचा सकारात्मक पुढाकार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आलापल्ली, ता. ८ ऑगस्ट :
पर्यावरणाच्या समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असून, त्याची जाणीव प्रत्येक स्तरावर होणे आवश्यक आहे. या उद्देशाने राणी दुर्गावती हायस्कूल, आलापल्ली येथे तालुका पत्रकार संघटनेच्यावतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पत्रकार, शिक्षक आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येत निसर्गसंवर्धनासाठीचा सकारात्मक संदेश दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष ऋषी सुखदेवे होते. डीडी न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी ओमप्रकाश चुनारकर, मुख्याध्यापक गजानन लोणबले, गणेश पाहापले, संघटनेचे सचिव रमेश बामनकर, उपाध्यक्ष आसिफ खान पठाण, सल्लागार सदस्य सदाशिव माकडे, तसेच अनिल गुरूनुले, अखिल कोलपपाकवार, विस्तारी गंगाधरीवार, मधुकर सडमेक यांसह विविध मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
या वेळी शालेय परिसरात विविध छायादार व फलद्रुप वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणानंतर उपस्थितांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली. कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पर्यावरणाबाबत आपली जाणीव व्यक्त केली.
“वृक्षसंवर्धन हे केवळ सामाजिक नाही तर राष्ट्रीय कर्तव्य” — प्राचार्य लोणबले..
या कार्यक्रमात बोलताना प्राचार्य गजानन लोणबले, अध्यक्ष सुखदेवे यांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले.“वाढती लोकसंख्या, अमर्याद शहरीकरण आणि वाढते प्रदूषण या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धन हे केवळ एक सामाजिक भान न राहता, राष्ट्रीय कर्तव्य बनले आहे,” असे मत त्यांनी मांडले.“झाडे केवळ सौंदर्य किंवा फळे देण्यासाठी नसून, ती शुद्ध हवा, जीवनदायी ऑक्सिजन आणि निसर्गाशी असलेली आपली नाळ टिकवून ठेवतात. म्हणूनच झाडे लावणे आणि ती जगवणे, ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे,” असेही प्रतिपादन करण्यात आले.
जागरूकतेची गरज आणि सहभागाचे मोल…
शहरी भागात झपाट्याने कमी होणारी झाडांची संख्या ही एक गंभीर बाब आहे. यावर उपाय म्हणून वृक्षारोपण केवळ एकदिवसीय औपचारिक उपक्रम न राहता, दैनंदिन सवयीचा भाग व्हावा, अशी अपेक्षा सहभागी मान्यवरांनी व्यक्त केली. युरोपातील अनेक शहरांत वृक्षसंवर्धनास सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. भारतातदेखील वृक्षलागवडीविषयी जनजागृती वाढत आहे; मात्र ती अपेक्षित पातळीवर पोहोचलेली नाही. सरकारी उपक्रमांसह नागरिकांनीही पुढाकार घेतला, तर पर्यावरण रक्षण अधिक प्रभावीपणे साधता येईल, यावर सर्वांनी एकमत दर्शवले.
“झाडे लावा, झाडे जगवा – हेच निसर्गाशी खरे नाते”हा उपक्रम पर्यावरण पूरक उपक्रमांची गरज अधोरेखित करतो. निसर्गाचे ऋण फेडायचे असल्यास झाडे लावणे आणि त्यांचे संवर्धन करणे हे आपल्या जीवनशैलीचा भाग बनवणे आवश्यक आहे.
ओमप्रकाश चुनारकर
डीडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली,
Comments are closed.