Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लॉकडाऊन आणि भुकेचा काळ संपूनही आदिवासी बांधव खावटी योजनेपासून वंचित.

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • आदिवासींच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका- विवेक पंडित यांचा सूचक इशारा.
  • आदिवासींना जगविण्यासाठी जाहिर केलेल्या खावटी योजनेचा लाभ त्यांना मेल्यानंतर मिळणार का ?
  • श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांचा आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांना संतप्त सवाल.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुंबई डेस्क, दि.१८ नोव्हेंबर: कोरोना महामारीच्या काळात राज्यसरकारने आदिवासीं बांधवांना दिलासा देण्यासाठी आर्थिक  मदत व जीवनावश्यक वस्तूं खावटी योजने अंतर्गत देण्याचा  शासन निर्णय दिनांक  ९ सप्टेंबर २०२० रोजी जाहीर झाला होता. परंतु लॉकडाऊन आणि भुकेचा काळ संपूनही आदिवासी बांधव खावटी योजनेपासून वंचित आहे. त्यामुळे खावटी योजनेच्या अंमलबजावणीत अपयशी ठरलेल्या आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांचा निषेध म्हणून त्यांना  श्रमजीवी  संघटनेतर्फे आदिवासी बांधवांच्या वतीने दिवाळी भेट देण्यात आली आहे. पालघर, ठाणे, नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून आदिवासींचे पारंपरिक खाद्याची शिदोरी आदिवासी विकास मंत्र्यांना दिवाळी भेट म्हणून  तहसीलदारांमार्फत देण्यात आली.

कोरोना-१९ या विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिनांक  २४ मार्च-२०२० पासून  देशभर लॉकडाऊन जाहिर केले होते. लॉकडाऊनमध्ये काम धंदे बंद झाले, अनेकांचे रोजगार गेले. त्यामुळे अगोदरच हलाखीचे जीवन जगत असलेल्या आदिवासींसमोर  जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला. म्हणून आदिवासींना दिलासा मिळावा या अपेक्षेने श्रमजीवी संघटनेने सतत पाठपुरावा, जनहित याचिका, हक्काग्रह आंदोलन, अन्न  सत्याग्रह  इत्यादी सर्व मार्ग वापरून लढा दिला, त्यानंतर  शासनाने आदिवासीं बांधवांना दिलासा देण्यासाठी आर्थिक मदत व जीवनावश्यक वस्तू खावटी योजनेअंतर्गत देण्याचे जाहीर केले, मात्र आज लॉकडाऊन होऊन आठ महिने उलटून गेले तरी शासन कागदी घोडे नाचवत असल्याने आदिवासींची खावटी ही कागदावरच राहिली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यामुळे  “खावटी योजनेच्या अंमलबजावणीत आदिवासी विकास विभाग आणि या खात्याचे मंत्री के. सी. पाडवी हे अपयशी ठरले असून, आदिवासींना जगविण्यासाठी जाहिर केलेल्या  खावटी योजनेचा लाभ त्यांना मेल्यानंतर मिळणार का?”  असा संतप्त सवाल श्रमजीवी संघटनेचे संस्थापक  तथा, राज्य स्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष श्री. विवेक पंडित यांनी आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांना केला आहे. तसेच  आजचा हा कार्यक्रम आदिवासी विकास मंत्र्यांच्या निष्क्रिय कार्यपद्धतीबाबत आदिवासींमध्ये असलेल्या संतापाचे आणि नैराश्याचे प्रतीक आहे, आज आदिवासी विकास मंत्र्यांनी आणि या पूर्ण विभागानेच आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे, आदिवासिंच्या सहनशीलतेचा अंत पाहण्याची चूक आदिवासी विकास मंत्री करत असून हे अत्यंत दुर्दैवी आणि तीव्र आंदोलनाला आमंत्रण देणारा प्रकार  आहे असे सूचक वक्तव्य यावेळी विवेक पंडित यांनी केले.

एकंदरीत, आदिवासी विकास विभाग आणि आदिवासी विकास  मंत्री के. सी. पाडवी यांचा  निषेध म्हणून पाडवी यांना आदिवासी बांधवांच्या वतीने  श्रमजीवी  संघटनेतर्फे  दिवाळी भेट देण्यात आली आहे. पालघर, ठाणे, नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून आदिवासींचे पारंपरिक  खाद्य असलेले कडूकांद, नागली, वरई, भात, चवळी, सुरण यांची शिदोरी आणि निवेदन यावेळी  आदिवासी विकास मंत्र्यांना दिवाळी भेट म्हणून  तहसीलदारांकडे देण्यात आली.  या आंदोलनात पालघर, ठाणे, रायगड आणि  नाशिक  येथील श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संखेने  उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.