आता दररोज सर्वच केंद्रावर मिळणार लस
आरोग्य विभागाचा निर्णय: गडचिरोली जिल्ह्यातील ७२ केंद्रावर पोहोचली लस
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २ मे: गडचिरोली जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी शासकीय सुट्टी व रविवार वगळता सर्वच लसीकरण केंद्रावर सर्वच दिवशी लस देण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. याची अंमलबजावणी गुरुवारपासून करण्यात आली.
४५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे जिल्हाभरात जवळपास साडेचार लाख नागरिक आहेत. १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. जवळपास साडे तीन महिन्यांपासून लसीकरण सुरू आहे. या कालावधीत किमान ५० टक्के तरी लसीकरण होणे अपेक्षित होते. मात्र केवळ सहा हजार २२६ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. टक्केवारी मध्ये हे प्रमाण केवळ १५ टक्केच आहे. कोरोनाची दुसरी लाट गंभीर स्वरूप धारण करीत आहे. अनेकांचा जीव जात आहे. अशा स्थितीत लसीकरणाची गती मात्र अतिशय मंद आहे.
गडचिरोली जिल्ह्यात ७० शासकीय व दोन खासगी अशी एकूण ७२ लसीकरण केंद्रे आहेत. यातील बहुतांशी लसीकरण केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्रीय स्तरावर सुरू करण्यात आली आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरचे लसीकरण केंद्र आठवड्यातून केवळ सोमवार, बुधवार, गुरुवार हे तीनच दिवस सुरु राहत होते. इतर दिवशी मात्र बंद राहत होते त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात लसीकरण होत नव्हते. ही बाब आरोग्य विभागाच्या लक्षात आल्यानंतर सर्वच केंद्रावर शासकीय सुट्टी व रविवार वगळता दररोज लसीकरण केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. आरोग्य विभागाच्या या नवीन निर्णयामुळे लसीकरणाची गती वाढेल अशी अपेक्षा आहे.
१७ हजार लस शिल्लक
आठ दिवसांपूर्वी लसींचा साठा संपल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील काही लसीकरण केंद्रे बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता सर्वच लसीकरण केंद्रावर लस पोहचविल्या आहेत. जिल्हाभरातील सर्वच केंद्रे आता सुरू झाली आहेत. जिल्ह्यात १७ हजार लस डोसचा साठा उपलब्ध आहे. पुन्हा आठ दिवसात काही लस डोस उपलब्ध होणार आहेत. पूर्ण प्रतिबंधात्मक लस घेतलेल्या नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला तरी त्याचा जीव जात नाही. ही बाब अनेकांच्या लक्षात येण्यास सुरुवात झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकही आता लगेच घेण्यासाठी पुढे येत आहेत. त्यामुळे लसीकरणाची गती वाढेल अशी अपेक्षा आहे.
Comments are closed.