Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गरोदर मातेचा व नवजात बालकाचा बळी; ‘कावळ अ‍ॅम्ब्युलन्स’ दाखवत काँग्रेसचा संतप्त एल्गार!

मुख्यमंत्र्यांचे ‘विकास स्वप्न’ कागदावरच; गडचिरोलीतील आरोग्य व्यवस्था मात्र अखेरच्या श्वासावर?.

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली दि,०८ : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व स्वतःकडे घेऊन सर्वांगीण विकासाची आश्वासने दिली असली, तरी प्रत्यक्षात हा जिल्हा आजही आरोग्य व्यवस्थेच्या व्हेंटिलेटरवर असल्याचे भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. दुर्गम भागातील अपुऱ्या आरोग्य सुविधा, रस्त्यांचा अभाव आणि प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे एका गरोदर मातेसह तिच्या नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवारी इंदिरा गांधी चौकात तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले. ‘कावळ अ‍ॅम्ब्युलन्स’ची प्रतिकृती उभी करत काँग्रेसने प्रशासनाच्या असंवेदनशीलतेवर जोरदार प्रहार केला. एकविसाव्या शतकातही रुग्णांना बांबूच्या झोळीतून वाहून न्यावे लागणे ही केवळ शरमेची नव्हे, तर संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाची कबुली असल्याचा आरोप करण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल आणि दुर्गम जिल्ह्यात रस्ते, रुग्णवाहिका आणि डॉक्टरांची कमतरता ही आजही कायम आहे. या दुर्लक्षाचा सर्वाधिक फटका कष्टकरी व आदिवासी जनतेला बसत असून, शासनाच्या ‘विकासाच्या गप्पा’ आणि जमिनीवरील वास्तव यातील दरी या घटनेने उघडी पाडली आहे. जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि सरकारच्या दाव्यांची अक्षरशः पोलखोल केली.

आंदोलनात बोलताना काँग्रेस नेत्यांनी ठणकावून सांगितले की, दुर्गम भागात आजही अ‍ॅम्ब्युलन्स पोहोचत नसल्यामुळे जीव धोक्यात येत आहेत. ही परिस्थिती शासनाने स्वतः निर्माण केलेली असून, त्याची जबाबदारी झटकता येणार नाही. मृत मातेच्या कुटुंबाला तात्काळ भरपाई द्यावी, अतिदुर्गम भागातील रस्ते युद्धपातळीवर दुरुस्त करावेत, जिल्ह्यातील रिक्त डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे तातडीने भरावीत आणि आरोग्य व्यवस्था सक्षम करावी, अशा ठोस मागण्या यावेळी करण्यात आल्या.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शासनाने यापुढेही डोळेझाक केली, तर हे आंदोलन जिल्हाभरात उग्र स्वरूपात छेडले जाईल, असा इशाराही ब्राह्मणवाडे यांनी दिला.

या आंदोलनात माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, राम मेश्राम, शहराध्यक्ष सतीश विधाते, वसंत राऊत, मिलिंद खोब्रागडे, राजेंद्र बुल्ले, प्रशांत कोराम, प्रमोद भगत, रमेश चौधरी, श्रीकांत देशमुख, वामनराव सावसाकडे, कविताताई भगत, पुष्पलता कुमरे यांच्यासह काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.