चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून : लेकरं झाली आईविना, बाप तुरुंगात
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली | प्रतिनिधी
संसाराचा पाया म्हणजे विश्वास. पण जेव्हा तोच डळमळतो तेव्हा आयुष्य उद्ध्वस्त होण्यास वेळ लागत नाही. कोरची तालुक्यातील सोनपूर येथे घडलेल्या घटनेने हेच वास्तव अधोरेखित केले आहे. संशयाच्या अंधारात आणि दारूच्या नशेत भरकटलेल्या एका पतीने स्वतःच्या पत्नीचा गळा आवळून खून केला. या शोकांतिकेमुळे दोन निरागस लेकरं एका क्षणात आईविना आणि बाप तुरुंगात अशी दयनीय झाली.
मृत पत्नीचे नाव टामिनबाई पुरुषोत्तम कचलाम (३४) तर आरोपी पतीचे नाव पुरुषोत्तम गजराज कचलाम (३४) असे आहे. गेल्या काही वर्षांपासून दाम्पत्याच्या आयुष्यात चारित्र्याच्या संशयाची भिंत उभी राहिली होती. ३१ ऑगस्ट रोजी त्यांच्यात पुन्हा वाद झाला. १ सप्टेंबर रोजी पुरुषोत्तमने पत्नीला माहेरी सोडण्यासाठी पायी निघाल्यावर सोनपूर–गोटगुल दरम्यानच्या कामेली जंगलात आणखी भांडण पेटले. संतापाच्या भरात पुरुषोत्तमने पत्नीचा गळा आवळला, तिचा खून केला आणि मृतदेह जंगलात टाकून परत गावात गेला. नंतर दारूच्या नशेत त्याने पोलिसांपुढे गुन्ह्याची कबुली दिली.
या घटनेनंतर मृत महिलेच्या आईच्या तक्रारीवरून कोरची पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपीला अटक केली. पुढील तपास एसडीपीओ रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कोटगुल ठाण्याचे प्रभारी अधिकारी कृष्णा सोळंके करीत आहेत.
या दाम्पत्याला ९ आणि ५ वर्षांची दोन मुले आहेत. आई कायमची हिरावली आणि वडील तुरुंगाच्या भिंतीआड—या दुहेरी आघाताने निरागस बाल्य आयुष्यभरासाठी जखमी झाले आहे. या शोकांतिकेने केवळ एका कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे अंतःकरण हेलावले आहे.