रानटी हत्तींचा हल्ला — थोडक्यात बचावले शेतकरी; प्रशासन मात्र झोपेत?”
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्र पुन्हा एकदा दहशतीच्या छायेत आले आहे. वडेगाव-बंध्या परिसरात गेल्या महिनाभरापासून रानटी हत्तींच्या कळपाने अक्षरशः उच्छाद मांडला असून, ११ मार्चपासून सुरू झालेल्या या संकटाने आता थेट शेतकऱ्यांच्या जीवावर बेतण्यास सुरुवात केली आहे. आज सकाळी सातच्या सुमारास शेतीकामासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर अचानक हत्तींच्या कळपाने हल्ला चढवला. सुदैवाने काही शेतकरी थोडक्यात बचावले असले, तरी अनेकजण जखमी झाले असून त्यांच्यावर केशोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

घटनेची भीषणता अशी की, सकाळच्या शांत वातावरणात आपल्या रोजच्या जगण्याचा आधार असलेल्या शेतात गेलेल्या शेतकऱ्यांना जवळच हत्तींचा कळप दबा धरून बसल्याची कल्पनाही नव्हती. अचानक हा कळप संतप्त होऊन शेतकऱ्यांच्या दिशेने धावून आला. काहींना पाठीमागून जोरदार धक्का देत खाली पाडले, तर काहींनी जीव वाचवण्यासाठी अक्षरशः पळ काढला. या सगळ्या गोंधळात अनेक शेतकरी जखमी झाले. स्थानिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना केशोरी येथे उपचारासाठी हलवले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, या हत्तींच्या कळपाने केवळ जीवितहानीच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या पोटावरही घाला घातला आहे. मक्यासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता दुहेरी संकट उभे ठाकले आहे. “एकीकडे पिकं उध्वस्त, दुसरीकडे जीवाची भीती” — अशी अवस्था या भागातील शेतकऱ्यांची झाली आहे.
या पार्श्वभूमीवर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असले तरी, केवळ “लक्ष ठेवत आहोत” या भूमिकेपलीकडे कोणती ठोस कारवाई होताना दिसत नाही. हत्तींच्या हालचालींवर नियंत्रण, शेतकऱ्यांना सुरक्षितता, किंवा नुकसानग्रस्तांना तातडीची मदत — या मूलभूत बाबींमध्ये प्रशासनाची निष्क्रियता पुन्हा एकदा उघडी पडली आहे. वारंवार होणाऱ्या अशा घटनांनंतरही ठोस उपाययोजना न केल्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
वनविभागाने शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असले, तरी “सावध राहा” एवढ्यावरच जबाबदारी झटकणे कितपत योग्य, असा सवाल उपस्थित होत आहे. जंगलातून बाहेर पडणाऱ्या हत्तींच्या कळपाला रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना, तातडीचे संरक्षण यंत्रणा आणि नुकसानभरपाईची जलद प्रक्रिया — या सगळ्यांचा अभावच या संकटाला अधिक भीषण बनवत आहे.

