Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जीव गेल्यानंतर निर्देश देणारे सरकार सुरक्षा पूरवेल का? भाजपा प्रदेश उपाध्यक्ष वाघ यांचा सवाल

जिल्हा सामान्य रुग्णालयात दहा निष्पाप बालकांच्या दुर्दैवी मृत्युनंतर आज चित्रा वाघ यांनी भंडारा येथे दिली भेट

दोषी अधिकाऱ्यांवर ताबडतोब कारवाई करण्याची मागणी वाघ यांनी केली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भंडारा, दि. १० जानेवारी : जीवनाची हमी देण्याचे दायित्व सरकारचे आहे. अशा पद्धतीने निष्काळजीपणामुळे दहा निष्पाप बालकांचा जीव जात असेल तर खरंच अशा सरकार कडून सुरक्षेची अपेक्षा करायची का? आज दहा लोकांचे जीव गेल्यानंतर सरकारने विविध प्रकारचे ऑडिट करण्याच्या सूचना केल्या. हे करण्यासाठी सत्तेत आल्यापासून यांना कोणी रोखले होते असा प्रश्न उपस्थित करीत या संपूर्ण घटनेची सेवानिवृत्त न्यायाधीश यांच्यामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयात दहा निष्पाप बालकांच्या दुर्दैवी मृत्युनंतर आज चित्रा वाघ यांनी भंडारा येथे भेट दिली. सुरुवातीला त्यांनी या दुर्दैवी घटनेत मुल गमावलेल्या भोजापुर येथील बेहरे कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली. या भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. आठ जानेवारी चा दिवस हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस आहे. अक्षम्य हलगर्जीपणा चे म्हणुनच त्या दहा निष्पाप बालकांना प्राण गमवावे लागले. अग्नीरोधक यंत्रणा सुसज्ज असायला हवी. मात्र रुग्णालयात ती नव्हती. यासाठी प्रधान सचिवांकडे प्रस्तावही पाठविण्यात आला होता. कदाचित या प्रस्तावावर कारवाई झाली असती तर आज हा प्रसंग ओढवला नसता असेही वाघ म्हणाल्या. इकडे आम्ही आरोग्य संस्थांच्या माध्यमातून बाळंतपण व्हावे यासाठी आग्रह धरतो. पण दुसरीकडे अशा पद्धतीने जीव जात असतील तर महिला शासकीय रुग्णालयांमध्ये बाळंतपणाचा विचार कसा करणार. घटनेनंतर आता राज्यातील रुग्णालयांचे सगळ्या प्रकारचे ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरकारला सत्तेत आल्यापासून का सुचले नाही असा प्रश्न उपस्थित करीत सरकारची उदासीनता जीवघेणी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आज ज्या कुटुंबांनी मुलांना गमावले आहे. ते अत्यंत धक्क्यात आहेत. त्या सगळ्यांना समुपदेशनाची गरज असून शासनाने पुढील काही दिवस त्यांची मोफत समुपदेशन करावे अशी मागणी त्यांनी केली. या संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय समिती नेमून माजी न्यायाधीशाच्या मार्फत चौकशी करावी. ज्यांच्याकडे अग्निशमन यंत्रणेसाठी प्रस्ताव पाठवला होता अशा आरोग्य संचालकांच्या नेतृत्वात चौकशी करण्याचा खोडसाळपणा सरकारने करू नये असे सांगताना दोषी अधिकाऱ्यांवर ताबडतोब कारवाई करण्याची मागणी वाघ यांनी केली आहे. जनतेला सुरक्षा पुरविण्याची जबाबदारी सरकारची आहे. मग अशा असुरक्षित वातावरणात लोकांनी कोणाकडून अपेक्षा करावी असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पत्रकार परिषदेला खासदार सुनील मेंढे, जिल्हाध्यक्ष शिवराम गिरेपुंजे, माजी जिप अध्यक्षा वंदना वंजारी, माजी आमदार चरण वाघमारे,  जिल्हा महामंत्री मुकेश थानथराटे, प्रशांत खोब्रागडे, संजय कुंभलकर उपस्थित होते.     

Comments are closed.