Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाघाच्या हल्ल्याने मोहटोळी वेचणीस गेलेल्या महिलेचा मृत्यू : वन प्रशासनाचा ढिसाळपणा उघड

देलोडा जंगलातील हृदयद्रावक घटना; पती आणि दोन मुलांनंतर घराचा आधार हरपला...

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली: आरमोरी तालुक्यात पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्याने मानवी बळी घेतला आहे. मोह टोळ वेचणीसाठी जंगलात गेलेल्या मीरा आत्माराम कोते (वय ५५, रा. सुवर्णनगर, देलोडा) या महिलेला ५ जून रोजी सकाळी दबा धरून बसलेल्या वाघाने ठार मारले. ही घटना पोर्ला वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. १० मध्ये घडली असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

हल्ल्याचा थरकाप : जंगलात एकाकी गेलेल्या महिलेला निशाणा..

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मीरा कोवे या सकाळी मोह टोळी वेचण्यासाठी गावालगतच्या जंगलात गेल्या होत्या. मोहसारख्या हंगामी जंगलोत्पन्नावर अनेक आदिवासी कुटुंबांची उपजिविका अवलंबून असते. त्या झाडांखाली टोळ वेचण्यात मग्न असतानाच दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर झडप घातली. घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. दुपारीपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध सुरु केला. सायंकाळी ४ वाजता त्यांचा मृतदेह सापडला.

घराची शेवटची आधारवडही कोसळली..

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मीरा कोवे यांचा संसार दुःखांनी भरलेला होता. पतीचे निधन दहा वर्षांपूर्वी झाले, तर दोन मुलांचाही आजाराने दुर्दैवी अंत झाला. मोलमजुरी, जंगलातील हंगामी वेचणीवर त्यांचे जीवन सुरू होते. सून आणि दोन नातवंडांच्या संगतीने त्या शेती आणि जंगलाच्या भरवशावर संसार पुढे नेत होत्या. मात्र, आता त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

वनविभागाची निष्काळजी प्रशासन : सूचक इशाऱ्यांकडे दुर्लक्ष?

या भागात वाघाचा वावर असल्याची माहिती नागरिकांनी आधीच दिली होती. पोर्ला-वडधा मार्गावर काही नागरिकांना वाघाचे दर्शनही झाले होते. तरीदेखील कोणतीही खबरदारी, सूचना वा जंगलात जाण्यावर बंदी लावली गेली नव्हती. परिणामी, वन विभागाच्या निष्काळजीपणाचा फटका मीराबाईंना आपला जीव गमावून बसून बसावा लागला.

दुसऱ्या बळीने अधिक गंभीरतेची गरज..

ही घटना केवळ वैयक्तिक शोकांतिका नसून वन्यप्राण्यांच्या वाढत्या संख्येचा आणि मानवी वस्त्यांशी होत असलेल्या संघर्षाचा गंभीर इशारा आहे. मार्च २०२५ मध्ये चामोर्शी तालुक्यातील गणपूर (रै.) येथेही वाघाच्या हल्ल्यात एक पुरुष ठार झाला होता. ही वर्षातील दुसरी घटना असूनही अजूनही ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत.

प्रशासनाकडून केवळ पंचनामा आणि सांत्वनाची भाषा..

घटनेनंतर वन विभागाने घटनास्थळी पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. मात्र, सतत होणाऱ्या अशा घटनांवर कुठल्याही दीर्घकालीन उपाययोजनांची नोंद नाही. केवळ तत्काळ दिलासा आणि सरकारी मदतीची आश्वासने म्हणजे प्रशासनाच्या पोकळ कारभाराचे प्रतीक ठरत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.