Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“अबुझमाडमध्ये निर्णायक कारवाई ; बसवराजूसह २७ नक्षलवादी ठार, जवान शहीद”

नक्षलविरोधातील अभियान ठरले लाल आतंकचा कर्दनकाळ..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

ओमप्रकाश चुनारकर/रवि मंडावार, 

गडचिरोली: छत्तीसगडच्या अबुझमाड जंगलात बुधवारी सुरक्षा दलांनी मोठं अभियान राबवत २७ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीत एक जवान शहीद झाला असून आणखी एक जखमी झाला आहे. यात सर्वात मोठी कामगिरी म्हणजे नक्षल चळवळीचा मुख्य मेंदू समजल्या जाणाऱ्या आणि देशभरातील सुरक्षायंत्रणांना अनेक वर्षं चकवणाऱ्या सीपीआय (माओवादी) चा सरचिटणीस नंबला केशव राव ऊर्फ बसवराजू याचा खात्मा करण्यात आला. या कारवाईनंतर केंद्र व राज्य पातळीवरील सुरक्षा यंत्रणांमध्ये समाधानाची भावना आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बसवराजू – नक्षल चळवळीचा ‘ब्रेन’..

बसवराजू उर्फ नंबला केशव राव हा नक्षल चळवळीतील सर्वात मोठा रणनीतिकार मानला जात होता. त्याच्यावर १.५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर होते. २०१८ मध्ये माओवादी चळवळीचे संपूर्ण नेतृत्व त्याच्याकडे सोपवण्यात आले होते. बी.टेक. शिक्षण घेतलेला बसवराजू मूळचा आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलमचा असून तो ‘गगन्ना’, ‘प्रकाश’ आणि ‘बीआर’ या टोपणनावांनी ओळखला जात होता. त्याचे वावर छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेशातील सीमावर्ती जंगलांमध्ये होता. त्याच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीच्या नेतृत्वात मोठी पोकळी निर्माण होण्याची शक्यता आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

चार जिल्ह्यांची समन्वित कारवाई..

ही चकमक छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात झाली. या कारवाईसाठी राज्य सुरक्षा बलांबरोबरच नारायणपूर, दंतेवाडा, कोंडागाव आणि विजापूर येथील डीआरजी (District Reserve Guard) चे जवान एकत्र आले होते. अत्यंत दुर्गम आणि धोकादायक अशा अबुझमाड जंगलात हे अभियान अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने राबवण्यात आले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा आणि नक्षल्यांची शवं मिळाल्याचे सांगण्यात येते.

२०१० च्या दंतेवाडा हल्ल्याचा मुख्य सूत्रधार होता बसवराजू ..

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचा महासचिव बसवराज उर्फ मल्लोजी गुड्दा याला आज सुरक्षा दलांनी चकमकीत ठार केले. सीआरपीएफ व डीआरजी (डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड) यांच्या संयुक्त कारवाईत ही कारवाई पार पडली.

बसवराज हा तोच नक्षल नेता होता, ज्याने २०१० साली दंतेवाडा येथे ७६ सीआरपीएफ जवानांच्या हत्या घडवून आणली होती. या घटनेची आखणी व अंमलबजावणी त्यानेच केली होती, अशी माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिली आहे.

आजच्या कारवाईत सुरक्षा दलांनी त्याला ठार मारल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. नक्षल चळवळीतील अत्यंत प्रभावी आणि धोकादायक नेता म्हणून त्याची ओळख होती. त्याच्या मृत्यूला सुरक्षा यंत्रणांनी मोठा यश मानले आहे.

इतिहासातली ‘टर्निंग पॉइंट’ मोहीम..गृहमंत्री अमित शहा..

गृहमंत्री अमित शहा यांनी या कारवाईचं वर्णन “इतिहासात नोंदवली जाईल अशी निर्णायक मोहीम” असं करत जवानांचं कौतुक केलं. “गेल्या तीन दशकांपासून नक्षल चळवळीविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात प्रथमच सरचिटणीस पातळीवरील नेतृत्वाचा खात्मा करण्यात आला आहे. २०२६ च्या मार्चपर्यंत छत्तीसगडमधून नक्षलवादाचा संपूर्ण अंत करण्याचा निर्धार आपण केला आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्रींचं अभिनंदन, लाल आतंकविरुद्ध निर्णायक पाऊल..

छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनीही जवानांचं अभिनंदन करताना म्हटलं की, “राज्यभर नक्षलविरोधी मोहिमेचा वेग वाढवण्यात आला आहे. हा संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर आहे.” या कामगिरीनंतर सुरक्षाबलांचा आत्मविश्वास दुणावला असून लाल आतंकाविरुद्धच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे.

अबुझमाडच्या बालेकिल्ल्यात खिंडार…

अबुझमाड हे छत्तीसगड आणि महाराष्ट्रात पसरलेलं घनदाट वनक्षेत्र, गेल्या अनेक वर्षांपासून नक्षल्यांचा बालेकिल्ला मानलं जात होतं. मात्र आता या भागात सुरक्षाबलांनी निर्णायक प्रवेश करत हा बालेकिल्ला हादरवला आहे. मागील सात दिवसांतील ही दुसरी मोठी कारवाई असून यापूर्वी ३१ नक्षलवाद्यांचा खात्मा झाला होता. आता २७ जणांना ठार मारण्यात आलं आहे.

नव्या पर्वाची सुरुवात…

या कारवाईनं नक्षल चळवळीला जबर धक्का बसला असून बसवराजूसारखा मेंदू हरविल्यानं या चळवळीची दिशा आणि रणनीती दोन्ही कोलमडण्याची शक्यता आहे. छत्तीसगडमध्ये सुरू असलेल्या या निर्णायक मोहिमेमुळे लाल आतंकाविरुद्धच्या लढ्याचं नवं पर्व सुरू झालं आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.