Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आई, मी चोर नाही… चिप्सच्या पिशवीमागे हरवले एक बालपण

12 वर्षीय कृष्णेंदूची आत्महत्या; चोर ठरवून अपमान, उठाबशा आणि शेवटी मृत्यू...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

कोलकाता : “आई, मी चोर नाही. मला कुरकुरे खूप आवडतात…”एका निरागस मुलाच्या चिठ्ठीतले हे शेवटचे शब्द. शब्द नाहीत, तर अंतःकरण विदीर्ण करणारा हुंदका आहेत. पश्चिम मिदनापूरमधील पानस्कुरा भागात केवळ चिप्सच्या पॅकेटमुळे एका १२ वर्षीय मुलाचे आयुष्य संपले. चोरीचा आरोप, अपमानास्पद वागणूक आणि घरच्यांचीही वागणूक… हे सगळं त्याच्यासाठी असह्य ठरलं.

गोसाईबर मार्केटमधील एका दुकानासमोर गुरुवारी संध्याकाळी कृष्णेंदू दास कुरकुरेच्या पॅकेटसाठी थांबलेला होता. दुकानदार नव्हता. थोड्या वेळाने, दुकानाजवळ रस्त्यावर पडलेले एक पॅकेट त्याने उचलले. नंतर ते पॅकेट न विचारता घेतल्याच्या आरोपावरून दुकानदार शुभंकर दीक्षितने त्याला सार्वजनिक ठिकाणी चापट मारली, उठाबशा काढायला लावल्या. त्याच्या आईलाही बोलावण्यात आले; तिनेही त्याला शिव्या दिल्या, चापट मारली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

स्वतःला खोलीत बंद करून, बेशुद्ध होईपर्यंत रडणारा कृष्णेंदू शेवटी गेला… त्याने चिठ्ठीत लिहिलं — “मी पैसे देणार होतो, पण काका नव्हते. पॅकेट रस्त्यावर होतं. मी चोर नाही…”

ही चिठ्ठी म्हणजे आपल्या समाजाचा आरसा आहे — जिथे बालमनाची भूकही संशयाने मोजली जाते. कृष्णेंदूला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण अखेर त्याने आपला श्वास सोडला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हा प्रकार केवळ एका मुलाच्या मृत्यूपुरता नाही. तो आपली सामूहिक असंवेदनशीलता उघडी पाडतो. चोर ठरवणं सोपं आहे, पण त्यातून हरवतं एक बालक… एक संधी… आणि अखेर एक जीव.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पण समाज म्हणून आपल्याला स्वतःच्या मनाचाही तपास घ्यावा लागेल.

Comments are closed.