लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आंध्र प्रदेशातील अल्लूरी सीतारामाराजू जिल्ह्याच्या मारेडपल्ली जंगल परिसरात मंगळवारी सकाळी ग्रेहाउंड कमांडोंनी घडवलेल्या चकमकीत माओवादी चळवळीतील केंद्रीय समिती सदस्य गजारला रवि याच्यासह तिघे वरिष्ठ नक्षलवादी ठार झाले असून या कारवाईनं दक्षिण भारतातील नक्षल नेटवर्कला मोठा हादरा दिला आहे.
रवि हा छत्तीसगडसह बस्तर भागात अनेक वर्षांपासून सक्रिय असून त्याच्या नावावर गंभीर हिंसाचाराच्या घटना नोंदवलेल्या आहेत. २०१२ मध्ये बीएसएफच्या तुकडीवर घातलेल्या हल्ल्यात एक कमांडंटसह तीन जवानांचा मृत्यू झाला होता आणि शस्त्रास्त्रे लुटली गेली होती. सरकारनं त्याच्या डोक्यावर ४० लाखांचे बक्षीस ठेवले होते आणि तो २०१४ पासून फरार होता.
या चकमकीत ठार झालेल्यांमध्ये विशेष विभागीय समिती सदस्य अरुणा हिचाही समावेश असून ती वरिष्ठ माओवादी नेते चळापतीची पत्नी होती. तिच्यावर २० लाखांचे बक्षीस होते. अल्लूरी सीतारामाराजू जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमित बर्दार यांनी कारवाईची अधिकृत माहिती दिली असून जंगलात अजूनही शोधमोहीम सुरू असल्याचे सांगितले.
ही कारवाई केवळ स्थानिक पातळीवरील चकमक नसून नक्षल चळवळीच्या गाभ्यावर मारलेला मोठा प्रहार मानली जात आहे. विशेष म्हणजे गेल्या १३ दिवसांत माओवादी केंद्रीय समितीचे तीन सदस्य ठार झाले आहेत. याआधी बीजापूर जिल्ह्यातील नॅशनल पार्क परिसरात सुधाकर ऊर्फ नरसिंहाचलम याला ठार करण्यात आले होते. त्याच्या डोक्यावर १ कोटीचे इनाम होते. त्यानंतर लगेचच भास्कर नावाचा दुसरा वरिष्ठ नक्षलवादी इंद्रावती नॅशनल पार्कमध्ये ठार झाला होता आणि त्याच्याजवळून अत्याधुनिक शस्त्रास्त्रेही जप्त करण्यात आली होती.
मारेडपल्ली येथील चकमक ही या मोहिमेचा पुढचा टप्पा मानली जात असून ग्रेहाउंड कमांडो आणि अन्य दलांकडून सुरू असलेली ही मोहीम संपूर्ण जंगल परिसरात अधिक तीव्र करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही कारवाई केवळ सशस्त्र प्रतिसादापुरती मर्यादित नसून माओवादी नेतृत्वाचा कणा मोडण्यासाठी आखलेल्या रणनीतीचा भाग आहे.
Comments are closed.