Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मेडिगड्डा बॅरेजजवळ गोदावरीत सहा तरुण बेपत्ता; पालकांचा आक्रोश..

उन्हाळी सहलीचे दुर्दैवात रूपांतर; प्रशासनावर संतप्त प्रतिक्रिया...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जून : उन्हाळ्याच्या सुट्टीत गोदावरीच्या काठावर जलविहारासाठी गेलेल्या तरुणांचा आनंद क्षणात शोकांतिका ठरला. शनिवारी सायंकाळच्या सुमारास महादेवपूर मंडळातील अंबातीपल्ली गावाजवळील मेडिगड्डा बॅरेज परिसरात सहा तरुण खोल पाण्यात बुडून बेपत्ता झाले. सायंकाळच्या उन्हात सुरू झालेली जलमस्ती काही क्षणांत आक्रोशात बदलली. पोहण्याचा आनंद घेणाऱ्या तेरा जणांच्या गटातील सहा तरुणांना खोल व अनपेक्षित प्रवाहाचा फटका बसला आणि ते पाण्यात ओढले गेले.

बेपत्ता झालेल्यांमध्ये अंबातीपल्ली गावातील चार, महामुत्थाराम मंडळातील कोरलाकुंटा गावातील एक आणि पीपी स्तंभपल्ली येथील एक तरुणाचा समावेश आहे. ही घटना समोर येताच गावात हाहाकार माजला असून पालकांचे आणि नातेवाईकांचे अश्रू थांबता थांबत नाहीत. काही पालक घटनास्थळी जमिनीवर कोसळून दुःख व्यक्त करत होते. “सकाळी स्वतःच्या पायांनी गेलेली मुलं आता कधीच परत येणार नाहीत का?” असा हतबल प्रश्न अनेक माता-पित्यांच्या ओठांवर होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

घटनेची माहिती मिळताच महादेवपूर पोलीस ठाण्याचे एसआय पवनकुमार यांच्या नेतृत्वाखाली पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत गोताखोरांना पाचारण केले. अंधारामुळे काही अडचणी येत असल्या तरी गोदावरी नदीत शर्थीची शोधमोहीम राबवली जात आहे. प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन दल आणि स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीने मृतदेहांचा शोध घेतला जात आहे. रविवारी सकाळी सहा वाजता पासून शोध मोहीम सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

या भागात सुरक्षा यंत्रणा, सूचना फलक किंवा नदी परिसराची पूर्वकल्पना देणारे कोणतेही चिन्ह नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. याठिकाणी दरवर्षी उन्हाळ्यात तरुणांची गर्दी असते, मात्र कोणतेही जलसुरक्षा उपाय वा रक्षक नेमले जात नाहीत, हे प्रशासनाचे गंभीर अपयश असल्याची भावना व्यक्त होत आहे. काही पालकांनी तर प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, काही राजकीय प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे.या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण महादेवपूर मंडळात शोककळा पसरल्याचे वातावरण असून सर्वत्र दुःखाचे सावट ,दु:ख गावकऱ्यात दिसून येत आहे.

तर भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी स्थानिक यंत्रणांचा किती सजग आणि जबाबदार सहभाग राहतो, याकडेही लक्ष लागून आहे असल्याचे मत व्यक्त केला आहे.

Comments are closed.