Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“बस्तरच्या जंगलात ‘रुपी रेड्डी’चा अंत: ५ लाखांची इनामी महिला नक्षली चकमकीत ठार”

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, : जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या छत्तीसगड राज्यातील काँकेर जिल्ह्यातील माचपल्लीच्या जंगलात सोमवारी पहाटे पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या तुंबळ चकमकीत जहाल महिला नक्षलवादी रंगाबोईना भाग्या उर्फ रुपी रेड्डी हिला ठार करण्यात आले. तिच्यावर पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते. या कारवाईमुळे बस्तर परिसरातील नक्षलविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे.

छोटेबेठिया पोलिस ठाण्याच्या हद्दीत नक्षलवादी हालचाली सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या भागात शोधमोहीम राबविली होती. सोमवारी पहाटे सुमारे ४ वाजताच्या सुमारास जंगल परिसरात पोलिस व नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. पोलिसांचा वाढता दबाव पाहून काही नक्षली अंधाराचा फायदा घेत पसार झाले. मात्र, कारवाईदरम्यान एका महिला नक्षलीचा मृतदेह आणि स्वयंचलित रायफल पोलिसांनी जप्त केली. तपासाअंती मृत नक्षली ही रुपी रेड्डी असल्याचे स्पष्ट झाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कोण होती रुपी रेड्डी?

मूळची तेलंगणा राज्यातील रहिवासी असलेली रुपी रेड्डी २००४ पासून नक्षल चळवळीत सक्रिय होती. छत्तीसगडमधील माड डिव्हिजनमध्ये ती विभागीय समिती सदस्य म्हणून कार्यरत होती, तसेच उत्तर बस्तरमधील परतापूर क्षेत्रीय समितीची (एसीएम) जबाबदारीही ती सांभाळत होती. छत्तीसगडमध्ये कार्यरत असलेल्या तेलंगणा कॅडरमधील ती अखेरची सक्रिय महिला नक्षलवादी मानली जात होती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ती स्पेशल झोनल कमिटी सदस्य सुगुलुरी चिन्नाना उर्फ विजय रेड्डी याची पत्नी होती. १३ ऑगस्ट २०२५ रोजी मोहल्ला-मानपूर-अंबागड चौकी जिल्ह्यात झालेल्या चकमकीत विजय रेड्डी ठार झाल्यानंतरही रुपी रेड्डी नक्षल चळवळीत सक्रिय राहिली होती.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार जाहीर केल्यानंतर अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारला. मात्र, रुपी रेड्डीने आत्मसमर्पणास नकार देत इतरांना देखील त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता. अखेर सुरक्षा दलांच्या संयुक्त कारवाईत तिचा अंत झाला.

या कारवाईमुळे बस्तर-गडचिरोली सीमावर्ती भागातील नक्षलविरोधी मोहिमेला निर्णायक बळ मिळाले असून, उर्वरित नक्षलवाद्यांवर दबाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.