टॉप नक्षल नेता ठार, एक कोटीचे बक्षीस, दहांचा खात्मा,सुरक्षा दलांसाठी ऐतिहासिक यश…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
रायपूर : छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात सुरक्षा दलांनी राबवलेल्या धाडसी कारवाईत टॉप नक्षल नेता मनोज ऊर्फ मोडेम बाळकृष्णसह दहा नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. १ कोटी रुपयांचे बक्षीस असलेला बाळकृष्ण नक्षल संघटनेचा कणा मानला जात होता. त्याच्या मृत्यूने संघटनेला मोठा धक्का बसला असून ही कारवाई सुरक्षा दलांसाठी ऐतिहासिक यश ठरली आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे बुधवारी रात्रीपासूनच पोलिस, सीआरपीएफ व कोब्रा बटालियनच्या संयुक्त पथकांनी मोहिम राबवली. गरियाबंदच्या जंगल परिसरात बाळकृष्ण व त्याच्या टोळीचा ठाव लागल्यानंतर गुरुवारी सकाळी चकमक उडाली. तासभर चाललेल्या या कारवाईत दहा नक्षलवादी ठार झाले, तर बाकीचे साथीदार घनदाट जंगलाचा आधार घेत पसार झाले.
सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांचे शस्त्रसाठा, दारूगोळा व साहित्य जप्त केले. अधिकाऱ्यांच्या मते बाळकृष्ण हा ओडिशा राज्य समितीचा वरिष्ठ सदस्य होता व अनेक रक्तरंजित कारवायांचा सूत्रधार होता. हत्या, लूट, पोलिसांवर हल्ले, विकासकामांना अडथळा निर्माण करणे अशा गुन्ह्यांत त्याचा सहभाग होता.
गरियाबंद जिल्हा नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून कुप्रसिद्ध आहे. मागील काही वर्षांत सुरक्षा दलांनी सलग मोहिमा राबवून या भागातील नक्षली चळवळीची कंबर मोडली आहे. वरिष्ठ नेत्यांच्या हत्येमुळे संघटनेचे जाळे सैलावत चालले असून स्थानिक नागरिकांमध्ये दिलासा पसरला आहे.
ही कारवाई केवळ सैनिकी यश नाही, तर जनतेला भयमुक्त करण्याचा टप्पा आहे. नक्षलवाद्यांच्या रक्तरंजित विचारसरणीला दिलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.