भीषण अपघात: झायलो पुलावरुन कोसळून सात जणांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये तिरोडातील आमदारपुत्राचाही समावेश
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
वर्धा, दि. २५ जानेवारी :’ वर्धा-देवळी मार्गावर रात्री १.३० वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात सात युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील भाजप चे आमदार विजयभाऊ रहांगडाले तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्र यांचे एकुलते एक सुपुत्र अविष्कार रहांगडाले याचा देखील मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यातील सावंगी येथे दत्ता मेघे मेडिकल कॉलेज ला एम बी बी एस अभ्यास करीत असलेले सात विद्यार्थी (युवक) झायलो गाडीने वर्धेला जातांना रात्री १.३० वाजताच्या सुमारास वर्धा मार्गावरील असलेल्या सेलसुरा येथील दुभाजकला धडकून झायलो गाडी पुलावरून खाली नदीच्या पात्रात कोसळली. त्यात गाडीतील सर्व गतप्राण झाले. अपघात इतका भीषण होता की गाडीतील सर्व साहित्याचा चेंदामेंदा झाला आहे.
विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक चालकाने सावंगी पोलिसांना या घटनेसंदर्भातील माहिती दिली. सावंगी पोलिसांना घटनेची माहिती प्राप्त होताच त्यांनी घटनास्थळ गाठले व घटनास्थळाचा पंचनामा केला. अपघातात गतप्राण झालेल्या सात जणांचे मृतदेह शवविच्छेदानासाठी सावंगी येथील रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले.
मृतकामध्ये निरज चौहान (एमबीबीएस शेवटचं वर्ष), अविष्कार रहांगडाले (एमबीबीएस पहिलं वर्ष), नितेश सिंह (इंटर्न), विवेक नंदन (एमबीबीएस अंतिम वर्ष), प्रत्युंश सिंह (एमबीबीएस अंतिम वर्ष), शुभम जैस्वाल (एमबीबीएस अंतिम वर्ष) आणि पवन शक्ती (पहिलं वर्ष) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावं आहे. यापैकी अविष्कार हा तिरोडाचे आमदार विजय रहांगडालेंचा मुलगा होता.
उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप यांनी सांगितले की सातही मुलांचे मृतदेह सावंगी येथील रुग्णालयामध्ये रात्रीस आणण्यात आले. यात तिरोडा येथील आमदारांचा मुलगा असल्याची चर्चा अपघातस्थळी मदत करणाऱ्यांमध्ये होती. सातही मेघे वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
हे देखील वाचा :
६ वर्षाच्या चिमुकलीला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर
Comments are closed.