Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक : वाघाच्या हल्ल्यात आणखी एक शेतकरी ठार…

वाघांनी घेतले वर्षभरात २२ जणांचे बळी...

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

ओमप्रकाश चूनारकर / मनोज सातवी 

गडचिरोली दि,२६ : गडचिरोली शहरापासून अवघ्या ८ की.मी अंतरावरील दिभना येथे आणखी एक शेतकऱ्याला वाघाने हल्ला करून ठार केले आहे. नीलकंठ गोविंदा मोहर्ले वय 52 वर्षे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. नीलकंठ यांच्या शेतालगत जंगल असून ते शेताच्या बाजूला अळिंबीची ( टेकोडे) ही रान भाजी काढत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात नीलकंठ यांचा जागीच मृत्यू झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. वन विकास महामंडळाच्या ब्रम्हपुरी विभागात असलेल्या पोर्ला वनपरिक्षेत्रातील खंड क्रं. 2 मध्ये आज दुपारी २.३० ते ३:०० वाजण्याच्या सुमारास दिभना- अर्मिझा रोड लगत नीलकंठ मोहर्ले हे आपल्या शेतावर गेले होते, नीलकंठ हे त्यांच्या शेतलागत असलेल्या जंगलात अळिंबीची ( टेकोडे) ही रान भाजी काढत होते. यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला करून ठार केले. घटनास्थळी वन विकास महामंडळाचे अधिकारी,कर्मचारी आणि गडचिरोली पोलीस दाखल झाले असून पुढील कारवाई करत आहेत.

गेल्या वर्षभरात गडचिरोली आणि वडसा वन विभागात तब्बल २२ जणांचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेला आहे. तर दिभना गावातील हा वर्षभरातील चौथा बळी गेला आहे. आरमोरी ,गडचिरोली वनपरिक्षेत्रातील असलेल्या जेप्रा, महादवाडी, चुरचुरा, दिभना या जंगलाच्या बाजूला असलेल्या गावांमध्ये अतिशय भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे वन विभागाच्या PRT (primary response team) पथकाच्या माध्यमातून जंगल परिसरातील शेतकऱ्याना वाघांच्या हल्ल्याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली जाते. मात्र सध्या शेतीची कामं असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतावर जाणे भाग असल्याने अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते. सातत्याने वन विभागात वाघाच्या हल्ल्यात वाढ होत असल्याने नरभक्षक वाघांचं बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.