Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनासाठी आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क २८ नोव्हेंबर :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनी अनुयायांनी चैत्यभूमी स्मारक येथे येऊ नये आणि कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेतर्फे ६४ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी महानगरपालिका प्रशासनातर्फे माहिती देताना सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर म्हणाले की, दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. मात्र, यंदा कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम असल्याने एकत्र येण्यावर निर्बंध आहेत. हा धोका लक्षात घेऊन मागील ७-८ महिन्यांमध्ये सर्वधर्मीयांनी आपापले सण-उत्सव अत्यंत साधेपणाने आणि एकत्र न येता साजरे केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन हा गांभीर्याने पालन करण्याचा व दुःखाचा दिवस आहे. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यंदा चैत्यभूमी येथे प्रत्यक्ष न येता, आपापल्या घरुन अनुयायांनी अभिवादन करावे, असे आवाहन करण्यात आले. अनुयायांना अभिवादन करता यावे म्हणून चैत्यभूमी येथील शासकीय मानवंदनेचे व अभिवादन कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण देखील केले जाणार आहे, त्याची लिंक सार्वजनिकरित्या दिली जाईल. महापरिनिर्वाण दिनी थेट प्रक्षेपण करण्यासाठी दूरदर्शनला देखील विनंती करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

Comments are closed.