Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तीन दिवस शाळा, विद्यालये, महाविद्यालये सदर कालावधीत बंद !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. १० जुलै : जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून गडचिरोली विशेषत: दक्षिण व दक्षिण-पूर्व भागात मुसळधार पाऊसासह अतिवृष्टी झालेली असून गोदावरी, प्राणहिता, बांडिया, पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती नद्यांच्या पाण्याची पातळी ही वाढत असून सदर पाणलोट क्षेत्रातील नद्या व नाल्यांना पूर आल्याने बरेच मार्ग बंद आहे. भारतीय हवामान विभागाचे प्रादेशिक कार्यालय, नागपूर द्वारा . 10 जुलै रोजी प्रसारित हवामान संदेशानुसार पुढील 72 तासात गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊसासह अत्याधिक पाऊसाची दाट शक्यता आहे. यामूळे जिल्हाधिकारी व जिल्‍हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 अंतर्गत पूरपरिस्थितीवर उचित प्रतिबंधात्मक उपाययोजनेतंर्गत गडचिरोली जिल्हा सीमाक्षेत्रामध्ये 11 जुलै ते 13 जुलै, 2022 चे पर्यंत विविध उपाययोजना लागू केल्या आहेत. यात प्रतिबंधित बाबी 13 जुलै, 2022 पर्यंत संपूर्ण गडचिरोली जिल्‍ह्यात प्रतिबंधित राहतील. जिल्ह्यातील सर्व शाळा, विद्यालये, महाविद्यालये सदर कालावधीत बंद असतील.

परवानगी देण्‍यात आलेल्‍या आस्‍थापनांचा अपवाद वगळता इतर सर्व कँटीन (आतिथ्य) सेवा बंद राहतील. सर्व खाजगी कार्यालये, खाजगी आस्थापना बंद असतील. पुढीलप्रमाणे व्यवसायास परवानगी आहे. यात सदर कालावधीत अत्यावश्यक सेवेशी संबंधित दुकाने सुरु राहतील तर इतर दुकाने सदर कालावधीत पूर्णत: बंद असतील. तथापि सर्व दुकानांची आवश्यक उचित खबरदारी घेणेचे जबाबादारी संबंधित दुकानमालकांची असेल. अत्यावश्यक सेवा यामध्ये पुढील बाबीचा समावेश असेल. रूग्णालये तपासणी/ निदान केंद्रे, रूग्ण तपासणी केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालय, औषध निर्माण कार्यशाळा, औषध निर्माण करण्याच्या कंपन्या, औषधी विक्री केंद्र आणि वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत आस्थापना आणि उपक्रम. पशुवैद्यकीय बाबी. किराणामाल दुकान, भाजी विक्रीची दुकाने, डेअरी, बेकरी, मिठाई विक्रीची दुकाने, खाद्यपदार्थ विक्री केंद्र. कोल्ड स्टोरेज आणि वेअरहाऊसिंग सर्विसेस. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था- रेल्वे, टॅक्सी, ॲटोरिक्शा, सार्वजनिक वाहतूक बसेस. स्थानिक प्रशासनाद्वारा करावयाची मान्सूनसंबंधी कामे. स्थानिक संस्थाव्दारा पार पाडल्या जाणारी सर्व सार्वजनिक स्वरूपाची कामे. टेलिकॉम क्षेत्राशी निगडीत देखभाल/दुरुस्ती इत्यादी कामे. मालवाहतूक. पाणी पुरवठाशी निगडीत सेवा. शेती क्षेत्राशी निगडीत सेवा. ई- कॉमर्स (केवळ अत्यावश्यक सेवेशी संबंधित बाबींना परवानगी असेल). प्रसार माध्यमे. पेट्रोल पंप, इंधन गॅस इ. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाने अत्यावश्यक म्हणून ठरविलेल्या सेवा/बाबी इ.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सर्व विभागातील विभाग प्रमुखांनी त्‍यांचे विभागातील 100 टक्के कर्मचारी यांची कार्यालयात उपस्थिती अनिवार्य करावे. सर्व शासकीय व निम-शासकीय कार्यालये नियमितपणे सुरु असतील. आपत्ती व्यवस्थापनातंर्गत वेळेवेर कोणत्याही विभागाचे मनुष्यबळ लागू शकते. सबब जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी हे आज दि.10 जुलै, 2022 चे रात्रौ 11.59 पर्यंत मुख्यालयी उपस्थित होतील, याची दक्षता घ्यावी. सदरील आदेशाचे पालन न करणारी/ उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल. सदरचे आदेश दिनांक 10/07/2022 रोजी निर्गमित करण्यात आले आहेत.

Comments are closed.