Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पंतप्रधानांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोविड संदर्भातील सूचनेचा केला स्वीकार

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • राज्यातील लसीकरण प्रमाण व आरटीपीसीआर चाचण्यांबाबत केंद्राचे समाधान
  • देशभरातील सर्व लस उत्पादक संस्थांना देणार प्रोत्साहन
  • कोविडचा संसर्ग थोपविण्यासाठी नव्या उत्साहाने पूर्णपणे सज्ज

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

  • मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना ग्वाही

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मुंबई डेस्क, दि १७ मार्च: गेल्या वर्षीप्रमाणे आता देखील संसर्गाला रोखण्यासाठी अतिशय काटेकोर पाऊले उचलण्यात येतील असा विश्वास देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी मिळावी जेणे करून लसीकरणाचा वेग वाढवता येईल तसेच हाफकिनला लस उत्पादन करण्याची मान्यता मिळावी अशी विनंती केली. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांची सूचना लगेचच उचलून धरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात सर्व राज्यांमध्ये लस उत्पादन करू शकणाऱ्या संस्थांना पाठबळ व प्रोत्साहन देण्यात येईल असे जाहीर केले.

आज दुपारी देशातील काही राज्यातील वाढत्या कोविड संसर्गाच्या अनुषंगाने केंद्र सरकारने पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी महत्वाच्या मुद्द्यांवर लक्ष वेधले.

दररोज ३ लाखांपर्यंत लसीकरण करण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की , लसीकरणासाठी ज्या केंद्रांची तयारी व क्षमता आहे अशा केंद्रांना किंवा रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी मिळावी. लसीकरणासाठी महाराष्ट्रात देखील अनेक खासगी रुग्णालयांनी नोंदणी केली आहे पण त्यापैकी किती जणांची प्रत्यक्ष तयारी आहे हे तपासून लसीकरण वाढविण्यात येईल. दररोज ३ लाखांपर्यंत लसीकरण व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येईल.

कोविड लसीचे हाफकिनकडून उत्पादन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना विनंती केली. हाफकिन बायो फार्मासिटीकल कॉर्पोरेशन लिमिटेड यांना मिशन कोवीड सुरक्षेअंतर्गत लसीची टेक्नॉलॉजी हस्तांतरण करण्या साठी आयसीएमआरच्या मार्गदर्शनाने परवानगी मिळावी जेणे करून लस प्रत्यक्ष उत्पादित करता येईल किंवा फील- फिनिश ( Fill & Finish) बेसिसवर हाफकीनला काम करता येईल, यामधून १२६ दशलक्ष कोविड लसी हाफकिनमार्फत उत्पादित होऊ शकतात असे मुख्यमंत्री म्हणाले. यावर पंतप्रधानांनी देशात सर्वच राज्यांत अशा प्रकारे लस उत्पादनात पुढाकार घेणाऱ्या उद्योग व संस्थांना प्रोत्साहन देण्याचे आणि त्यांची क्षमता २४ X ७ पूर्णपणे कशी वापरता येईल ते पाहण्याचे बैठकीत जाहीर केले.

राज्यात लसीकरण प्रमाण चांगले, मात्र आणखी प्रमाण वाढवा

लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्राचे काम समाधानकारक आहे असे आज सादरीकरणाच्या दरम्यान आरोग्य सचिवांनी सांगितले. महाराष्ट्रात आज सरासरी प्रत्येक दिवशी १ लाख ३८ हजार ९५७ डोस देण्यात येतात. इतर काही प्रमुख राज्यांच्या तुलनेत हे प्रमाण समाधानकारक आहे मात्र ते आणखीही वाढवावे असे सांगण्यात आले. राज्यात आजमितीस ३५ लाख ५२ हजार डोसेस देण्यात आले असून ३१ लाख ३८ हजार ४६३ डोसेस उपलब्ध आहेत. दररोज ३ लाख डोसेस दिल्यास १० दिवसांचा साठा असून तो अधिक वाढवून मिळावा अशी मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.

आरटीपीसीआर चाचणीबाबतही समाधान

राज्याने आरटीपीसीआर चाचण्या मोठ्या प्रमाणावर करण्यास सुरुवात केली असून एकूण चाचण्यांपैकी ७० टक्के चाचण्या या पद्धतीने केल्या जातात, हे प्रमाण देखील इतर राज्यांच्या तुलनेत समाधानकारक आहे असे आजच्या बैठकीत केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितले.

अचानक संसर्ग वाढीवर मार्गदर्शन मिळावे

महाराष्ट्राने वेळोवेळी केंद्रीय पथकांनी दिलेले सल्ले व मार्गदर्शन याप्रमाणे कोविडची लढाई लढली आहे. मधल्या काही काळात तर दिवसाला २ हजार रुग्णांपेक्षाही कमी रुग्ण आढळायला सुरुवात झाली होती मात्र आता काही जिल्ह्यांत ती संख्या खूप वेगाने वाढते आहे. महाराष्ट्र किंवा देशाच्या पश्चिमी भागातील राज्यांत अचानक झालेली ही मोठी वाढ संभ्रमात टाकणारी असून याविषयी तज्ञ, संशोधक यांनी प्रकाश टाकावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना केली. विषाणूचे हे कुठले म्युटेशन किंवा आणखी काही प्रकार आहे का याविषयी मार्गदर्शन व्हावे असेही त्यांनी पंतप्रधानांना सांगितले.

४५ वयापुढील सर्वाना लस देण्याची विनंती

पंतप्रधानांनी यावर जगातल्या कानाकोपऱ्यातील सर्वच देशांत वैज्ञानिक यासंदर्भात बारकाईने लक्ष ठेवून असून या बदलाचा अभ्यास करीत आहेत असे उत्तर दिले. लसीचे दोन डोस घेतल्यावरही विशिष्ट कालावधी उलटून गेल्यावर कोरोना झाल्याच्या काही घटना मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणल्या तसेच राज्यात पुढील काळात आम्ही मोठ्या प्रमाणावर लसीकरण आणि त्याजोडीनेच मास्क वापरत राहणे, सुरक्षित अंतर ठेवणे या आरोग्याच्या नियमांवर जास्तीत जास्त भर देणार आहोत असेही मुख्यमंत्री म्हणाले. बाधितांमध्ये तरुण गट पण आहे हे लक्षात घेऊन ४५ वर्षे वयोगटापासून पुढे सहव्याधी असो किंवा नसो, सर्वाना लसीकरण करावे अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली.

संपर्क शोधण्याचे आव्हान पेलणार

पहिल्यांदा जेव्हा माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम राबविण्यात अली तेव्हा बहुतांश टाळेबंदी होतीआणि त्यामुळे रुग्ण शोधणे आणि त्यांचे जास्तीतजास्त संपर्क शोधणे सोप्पे होते कारण सर्व परिवार व शेजारीपाजारी घरी असायचे . मात्र आता सर्व व्यवहार सुरु झाल्याने व कडक टाळेबंदी नसल्याने संपर्क शोधणे विशेषतः: मुंबईसारख्या महानगरांत आव्हानात्मक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले . तरीदेखील सर्व आरोग्य व पालिका यंत्रणांना परत एकदा युद्ध पातळीवर संपर्क शोधण्याचे काम हाती घेण्यास सांगण्यात येईल असेही ते म्हणाले.

महाराष्ट्रात १ मार्च रोजी ७ हजार ७४१ इतके रुग्ण वाढले होते. १५ मार्च रोजी हा एकदा १३ हजार ५२७ इतका झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण महाराष्ट्रात असून १ मार्च रोजी पॉझिटिव्हिटी दर १० टक्के होता तो आता १६ टक्के झाला आहे, यावर चाचण्यांची संख्या अधिक वाढविणे गरजेचे आहे असे सादरीकरच्या वेळी केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितले.

यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख तसेच मुख्य सचिव व मुख्यमंत्री सचिवालयातील, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.