Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मराठवाडा रेल्वे कोच प्रकल्पात पहिला कोच शेल तयार – आ. संभाजी पाटील निलंगेकर

  • या बोगी प्रकल्पामुळे मराठवाड्यातील 50 हजार पेक्षा अधिक बेरोजगार तरुणांना होणार रोजगार प्राप्त
  • केंद्र सरकारकडून सुशासन दिनानिमित्त मराठवाड्याला भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

लातूर, दि. 26 : देशातील चौथा आणि महाराष्ट्रातील पहिला रेल्वे बोगी प्रकल्प लातूरात उभारला जात आहे. या प्रकल्पातून मेट्रो कोच तयार करण्यात येणार असल्याचे यापुर्वीच सांगण्यात आले आहे. त्यानुसार रेल्वे कोच प्रकल्पात आज पहिला कोच शेल तयार झाल्याची माहिती आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे. सुशासन दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारने मराठवाड्याला ही भेट दिल्याबद्दल आ. निलंगेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचे आभार व्यक्त केले आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मराठवाड्यातून अनेक सुशिक्षीत तरुण रोजगारासाठी मराठवाड्याच्या बाहेर स्थलांतरीत होत होते. या तरुणांना मराठवाड्यातच रोजगार उपलब्ध करून द्यावा व मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळावी या उद्देशाने राज्यात मंत्री म्हणून काम करीत असतांना आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूर येथे रेल्वे बोगी प्रकल्प उभारण्यात यावा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

यासाठी आ. निलंगेकर यांनी पाठपुरावाही केला होता. या पाठपुराव्यानंतर लातूर येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीत देशातील चौथा आणि महाराष्ट्रातील पहिला रेल्वे बोगी प्रकल्प उभारण्याचे निश्चित करून त्याचे भुमिपुजनही केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आले होते. या भुमिपुजन प्रसंगीच डिसेंबर 2020 अखेर या प्रकल्पातून प्रत्यक्षात उत्पादनास सुरुवात होईल असे यावेळी सांगण्यात आले होते.

या बोगी प्रकल्पामुळे मराठवाड्यातील 50 हजार पेक्षा अधिक बेरोजगार तरुणांना रोजगार प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर औद्योगिक विकासालाही या बोगी प्रकल्पामुळे चालना मिळणार असून राज्यातील हा पहिला बोगी प्रकल्प मराठवाड्यात उभा रहात असल्यामुळे मराठवाड्याच्या विकासालाही गती मिळणार आहे. रेल्वे बोगी प्रकल्पाची उभारणी अतिशय गतीने झालेली असून दिलेल्या शब्दाप्रमाणे डिसेंबर 2020 अखेर प्रत्यक्षात उत्पादनास सुरुवात होण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे.

माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Comments are closed.