Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बस्तरचे वास्तव समोर आणणाऱ्या पत्रकाराला क्रूरतेनं संपवलं

मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडला

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

बस्तर : गेल्या काही काळापासून छत्तीसगडमधील बस्तरमधील वास्तव समोर आणणाऱ्या निर्भीड पत्रकार मुकेश चंद्राकर यांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. 28 वर्षीय पत्रकार मुकेश चंद्राकर हा 1 जानेवारीपासून बेपत्ता होता. पण शुक्रवारी (3 जानेवारी) त्यांची हत्या झाल्याचे समोर आले. छत्तीसगडमधील विजापूरमध्ये दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पत्रकाराचा मृतदेह सापडला. ‘बस्तर जंक्शन’ नावाचे यूट्यूब चॅनल चालवणारे मुकेश चंद्राकर 1 जानेवारीच्या रात्रीपासून बेपत्ता होते. शुक्रवारी त्यांचा मृतदेह ठेकेदाराच्या कंपाऊंडमध्ये बांधलेल्या सेप्टिक टाकीत सापडला.

छत्तीसगडमधील पत्रकारांनी मुकेश चंद्राकर यांनी कंत्राटदार सुरेश चंद्राकर विरोधात रस्तेबांधणीतील कथित भ्रष्टाचाराची बातमी दिली होती. त्यामुळे मुकेशचा हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्याचे शेवटचे ठिकाणही ठेकेदाराने बांधलेले कंपाऊंड असल्याचे सांगितले जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बीजापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मुकेशने आपल्या पत्रकारितेच्या प्रवासात अनेक अडचणींवर मात केली. ईटीव्हीवरून पत्रकारितेची सुरुवात करत, नंतर न्यूज 18 छत्तीसगड आणि शेवटी बस्तर जंक्शन या यूट्यूब चॅनलद्वारे त्यांनी दंडकारण्यातील आदिवासींच्या व्यथा, माओवादी चळवळींचे वास्तव आणि सुरक्षा दलांचा संघर्ष प्रभावीपणे मांडला.

या घटनेवर बस्तरचे पोलीस महानिरीक्षक पी सुंदरराज यांनी सांगितले की, “संबधित घटनेमध्ये पोलिसांना काही माहिती मिळाली आणि त्यानंतर एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात पोलिसांनी अनेकांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, पोलिसांची एक पथकदेखील यासंदर्भात दिल्लीला पाठवण्यात आले आहे.” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तसेच, या प्रकरणात असे सांगितले जात आहे की, पोलिसांच्या तपासानंतर ठेकेदार सुरेश चंद्राकर याच्या भावाला पोलिसांनी दिल्लीतून ताब्यात घेतले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मुकेश चंद्राकर यांची हत्या करणाऱ्यांना सोडणार नाही; मुख्यमंत्री विष्णू देव साई 

विष्णू देव साई म्हणाले, विजापूर येथील तरुण आणि पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येची बातमी अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. त्यांच्या निधनामुळे पत्रकारिता जगताची आणि समाजाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. मुकेश चंद्राकर यांची हत्या करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्याच्या सूचना आम्ही दिल्या आहेत. या दु:खाच्या प्रसंगी मृत आत्म्यास शांती देवो आणि शोकाकुल परिवारास बळ देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

Comments are closed.