लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
सिरोंचा : दि. ०९ डिसेंबर, गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्यात यावा, अशी अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनतेची व राजकीय पुढाऱ्यांची मागणी आहे.
अहेरी जिल्ह्याची निर्मिती झाल्यास सिरोंचा तालुक्यातील जनतेला २१२ किमी अंतर असलेल्या गडचिरोली जिल्हा मुख्यालयी जावे लागणार नाही. वेळ व पैशांची बचत होईल. त्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. या संदर्भात अनेकदा आंदोलने करण्यात आली. मात्र ही मागणी अद्यापही शासन दरबारी धूळ खात पडली आहे. विदर्भाचे रहिवासी असलेले देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांना येथील परीस्थिती माहीत आहे. त्यामुळे आता तरी अहेरी जिल्हा निर्माण होणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीसह विविध सामाजिक संघटना व अनेक राजकीय पक्षांतर्फे स्वतंत्र अहेरी जिल्ह्याच्या निर्मितीसाठी अनेकदा आंदोलने करण्यात आली. अनेक ठिकाणी उपोषण, धरणे आंदोलन करून शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात आला. मात्र या आंदोलनाची दखल सरकारने अजूनही घेतली नाही. अहेरी जिल्हा निर्मितीच्या संदर्भात घडामोडी सुरू असल्याचे सांगीतले जात असले तरी सरकार अहेरी जिल्हा निर्मितीबाबत सकारात्मक आहे, अशी परिस्थिती आजपर्यंत निर्माण झाली नाही.
सन २०१७ च्या प्रजासत्ताकदिनी शासनाकडून अहेरी जिल्हा निर्माण करून रेगुंठा, झिंगानूर, आसरअल्ली यासारख्या दुर्गम गावांना तालुक्याचा दर्जा प्राप्त होऊ शकतो. त्यामुळे रोजगाराची संधीही निर्माण होऊ शकते. विद्यमान सरकारने आता अहेरी जिल्हा निर्मितीबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी अहेरी उपविभागातील हजारो नागरिकांनी केली आहे.
काही जिल्हे निर्माण केले जाणार आहेत, अशी चर्चा संपूर्ण परिसरात सुरू होती. मात्र ही चर्चा अफवा ठरली. कारण त्यावेळी कोणत्याच जिल्हा निर्मितीची घोषणा करण्यात आली नाही. अहेरी जिल्हा निर्मिती करू, असे युती शासनाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीदरम्यानच्या जाहीरनाम्यात व प्रचारादरम्यान सांगितले होते. मात्र हे आश्वासन सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना पूर्ण करता आले नाही. अहेरी जिल्हा निर्माण झाल्यास या भागात विकासाची गंगा येऊ शकते.
हे ही वाचा,
Comments are closed.