Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्य सरकारने आचार संहितेचे कारण पुढे करू नये – चंद्रकांत पाटील

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

लातूर, दि. १० नोव्हेंबर: राज्यातील उद्धव ठाकरे सरकार विद्यमान परिस्थितीत शेतकऱ्यांना
पुरेशी नुकसान भरपाई देण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. आचार संहिता आपत्ती काळाची मदत देण्यात अडसर ठरत नसते असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी लातुरात केला.

सरकारकडे मंत्र्यांचे बंगले दुरुस्त करायला पैसे आहेत, पण शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत,
अशी टीका करून भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारची संवेदनशीलता संपल्याचा आरोप लातुरात पत्रकारांशी बोलताना केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने लातुरात मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी पाटील लातूर शहरात आले होते. यावेळीपत्रकारांशी संवाद साधताना आ. चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोरोनाविषाणूचा प्रादुर्भाव आता कांही अंशी कमी झाल्याने आपण संघटनात्मक बांधणीसाठी संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहोत. यावर्षी राज्याच्या बहुसंख्य भागात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशावेळी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहायला हवे, त्यांना भरघोष आर्थिक मदत द्यायला हवी. मात्र , राज्य सरकार याबाबतीतउदासीन दिसत आहे. सरकारला शेतकऱ्यांची अजिबात चिंता नाही, असेही आ. चंद्रकांत पाटील म्हणाले.

वेळेवर वेतन मिळत नसल्याने आर्थिक विवंचनेतून राज्य परिवहन महामंडळातील
एका कर्मचाऱ्याने आत्महत्या करताना सुसाईड नोट मध्ये आपल्या आत्महत्येला
राज्य सरकार जबाबदार असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे या प्रकरणी राज्य
सरकारवर गुन्हा दाखल व्हायला हवा,असेही पाटील म्हणाले. राज्य सरकार बारा
बलुतेदारांसह एकूण २० घटकांना आर्थिक मदतीचे पॅकेज द्यायचा साधा विचारही
करत नसल्याबद्दल त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. सद्यस्थितीत
राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याचे सांगून संवेदनशीलता संपलेले
ठाकरे सरकार घाबरट असल्याचा आरोपही त्यांनी केला. मराठवाडा पदवीधर मतदार
संघात या निवडणुकीत भाजपचे शिरीष बोराळकर विजयी होतील, असा आपणास विश्वास
असल्याचे सांगितले. यावेळी आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. रमेश कराड,
आ. अभिमन्यू पवार, माजी आमदार सुधाकर भालेराव , भाजप शहर जिल्हाध्यक्ष
गुरुनाथ मगे आदींची उपस्थिती होती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.