Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरुन होणार थेट प्रक्षेपण.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

मुंबई डेस्क, २० नोव्हेंबर: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन (दिनांक ६ डिसेंबर) निमित्ताने दादर येथील चैत्यभूमी स्मारक येथे करण्यात येत असलेल्या पूर्व तयारीची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्री. संजीव जयस्वाल यांनी आज (२० नोव्हेंबर २०२०) पाहणी केली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तसेच कोरोनाची दुसरी लाट येण्याची संभाव्यता लक्षात घेता यंदा राज्य शासनासह महानगरपालिका प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. त्याबाबतच्या कामकाजाचा विशेष आढावाही श्री. जयस्वाल यांनी यावेळी घेतला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अंत्यविधी मुंबईत दादर चौपाटी परिसरात झाले, ती जागा चैत्यभूमी स्मारक म्हणून साऱयांसाठी वंदनीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजे प्रतिवर्षी ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. त्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी व परिसरात वेगवेगळ्या सुविधांची कामे हाती घेतली जातात. प्रामुख्याने चैत्यभूमी येथे पुष्ट सजावट, रंगरंगोटी, किरकोळ दुरुस्ती, दिवाबत्ती यांचा त्यात समावेश असतो. ही सर्व नियमित कामे सध्या सुरु आहेत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्री. संजीव जयस्वाल यांनी या कामांची पाहणी करुन आढावा घेतला. तसेच आवश्यक ते निर्देशही दिले.

यंदा कोरोना विषाणू संसर्गाचा धोका पाहता तसेच त्याची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता, ती रोखण्यासाठी राज्य शासनासह बृहन्मुंबई महानगरपालिका देखील सतर्क व सज्ज आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे शासकीय मानवंदना प्रदान करुन हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. तथापि, कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्वांचे पालन करता यावे, कोरोनाचा प्रसार होवू नये म्हणून एकत्र येण्यावर निर्बंध आहेत. या कारणाने यंदा छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे कोणत्याही प्रकारच्या नागरी सुविधा अनुयायांना महापरिनिर्वाण दिनी उपलब्ध करुन देणे शक्य होणार नाही.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

असे असले तरी, यंदा शासकीय मानवंदना कार्यक्रमाचे ऑनलाईन व प्रसारमाध्यमांच्या सहाय्याने थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, जेणेकरुन अनुयायांसह सर्वांना आपापल्या घरी राहून, स्थानिक स्तरावरुन अभिवादन करता येईल. प्रत्यक्ष चैत्यभूमी येथे न येता, अनुयायांना अभिवादन करणे शक्य व्हावे म्हणून थेट प्रक्षेपणाची ही विशेष सोय करण्यात येत आहे. त्याचीही माहिती श्री. जयस्वाल यांनी यावेळी जाणून घेतली.

चैत्यभूमी येथील पूर्वतयारीची पाहणी केल्यानंतर श्री. जयस्वाल यांनी लगतच्या इंदू मिल येथेही भेट दिली. इंदू मिल जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक साकारत आहे. महापरिनिर्वाण दिनी येणारे अनुयायी इंदू मिल येथेही येतात. त्यामुळे तेथे दरवर्षी नेमकी कशी व्यवस्था केली जाते, त्याची माहिती श्री. जयस्वाल यांनी जाणून घेतली.

या पाहणीप्रसंगी उपआयुक्त (परिमंडळ २) श्री. विजय बालमवार, सहायक आयुक्त श्री. किरण दिघावकर, सहायक आयुक्त श्री. शरद उघडे हे उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.