Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

औरंगाबाद शहरातील शाळा राहणार 3 जानेवारीपर्यंत बंद, ग्रामीण भागातील शाळा होणार सुरु .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

औरंगाबाद डेस्क: – राज्यातील शाळा सोमवार पासून सुरू होणार असल्या तरी स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावेत असे निर्देश शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले होते. त्यानंतर औरंगाबादमध्ये फक्त ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. मुंबई, पुणे, ठाणे सारख्या शहरांनी शुक्रवारी बैठक घेत 3 जानेवारी पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर औरंगाबाद महानगर पालिका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष असताना कोरोनाचे वाढते संकट पाहता पालिका आयुक्त आस्तिकुमार पांडेय यांनी देखील शहरातील शाळा 3 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा जरी बंद असल्या तरी शिक्षकांना शाळेत यावं लागणार आहे. अशी माहिती आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी दिली.

महानगर पालिका हद्दीतील शाळा 3 जानेवारी पर्यंत जरी बंद असल्या तरी सुरु करण्याबाबत 20 डिसेंबरला पुढील आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. शाळा सुरू करत असताना शिक्षकांची आरोग्य तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 11648 शिक्षकांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. शनिवार पर्यंत 4000 शिक्षकांची आरोग्य तपासणी पूर्ण झाली असून यात 9 शिक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याच समोर आलं आहे. सोमवार पासून शाळा सुरू करत असताना शासनाच्या नियमांचं पालन करूनच शाळा सुरू करण्यात येतील अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागात 1876 शाळा आहेत. यापैकी ग्रामीण भागातील 824 शाळा पहिल्या टप्प्यात सुरू होणार आहेत. शाळा सुरू करत असताना पालकांची संमती आवश्यक असणार आहे. त्यानंतर एखाद्या ठिकाणी रुग्ण वाढले तर काही काळासाठी शाळा बंद ठेवण्यात येतील, नंतर पुन्हा शाळा सुरू करण्यात येतील. जिल्ह्यातील रुग्णसंख्या आटोक्यात आहे. 700 पेक्षा कमी रुग्ण असून जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 96 टक्के इतका झाल्याने दिलासा मिळाला असला तरी शहरात शाळा बंद असतील अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.

Comments are closed.