Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘चीनच्या आक्रमकतेला आळा घालण्यासाठी अमेरिका भारताच्या पाठीशी’

Get real time updates directly on you device, subscribe now.

वॊशिंग्टन: हिमालयाच्या पर्वतरांगांपासून दक्षिण चिनी समुद्रापर्यंत चीनच्या आक्रमकतेला आळा घालण्यासाठी अमेरिका भारताच्या पाठीशी उभी असल्याची ग्वाही ट्रम्प प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘ऑनलाईन’ पत्रकार परिषदेत दिली. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पीओ आणि संरक्षणमंत्री मार्क एस्पर हे पुढील आठवड्यात नवी दिल्ली दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिका प्रशासनाने ही भूमिका मांडली आहे.

चीन आणि भारत यांची सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक समोरासमोर ठाकल्यापासून अमेरिका या तणावाच्या परिस्थितीवर बारकाईने नजर ठेऊन आहे. अमेरिकेने भारताला नेहेमीच सहकार्य केले आहे. शस्त्रास्त्रांचा पुरवठा, एकत्रित सैन्य कवायती, माहितीची देवाण- घेवाण अशा प्रकारे अमेरिका सहकार्य करीत आहे. हिमालयातील सीमारेषांबरोबरच दक्षिण चिनी समुद्रात सुरू असलेली चीनची दादागिरी मोडून काढण्यासाठी भारताचा या क्षेत्रात वावर वाढायला हवा. केवळ या दोन ठिकाणीच नव्हे, तर संपूर्ण आग्नेय आशियामध्ये भारताने आपला प्रभाव निर्माण करावा, अशी अपेक्षा अमेरिकेने व्यक्त केली आहे.

भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये सन २०१६ पासून संरक्षणविषयक भागीदारी आहे. सध्याच्या काळात तर भारत हा अमेरिकेचा सर्वात विश्वासार्ह साथीदार आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या दोन्ही राष्ट्रांच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत विभागीय सुरक्षा, संरक्षण साहित्यांचा व्यापार, संरक्षणविषयक माहितीची देवाण घेवाण, दोन्ही देशांच्या सैन्यदलांमधील सामंजस्यात वाढ या मुद्द्यांवर प्रामुख्याने चर्चा होणार असल्याचेही या पत्रकार परिषदेत नमूद करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.