श्रीनगर: काश्मिरी जनतेच्या भावना भडकविणाऱ्या विधानांबद्दल पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी जम्मू- काश्मीर भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्याचे नायब राज्यपाल यांच्याकडे करण्यात आली आहे. ‘त्या’ विधानांबद्दल काँग्रेसच्या राज्य शाखेनेही मुफ्ती यांच्यावर टीका केली आहे.
मुफ्ती यांची १४ महिन्यांच्या स्थानबद्धतेतून मुक्तता केल्यानंतर त्यांनी घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, काश्मीरमध्ये प्रथम जम्मू काश्मीरचा ध्वज फडकेल आणि नांतर तिरंगा ! राज्याला स्वतंत्र झेंडा आणि स्वतंत्र घटना आहे म्हणून भारताचा तिरंगा आणि घटना इथे आहे. कलम ३७० रद्द करुन केंद्र सरकारने काश्मीरवर ‘डल्ला’ मारला आहे. मात्र, आम्ही काश्मीर हिरावून घेऊ देणार नाही. राज्याची स्वायत्तता काढून घेण्याचा अधिकार संसदेलाही नाही, असे त्या म्हणाल्या.
त्यांच्या वक्तव्याची दाखल घेऊन नायब राज्यपालांनी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना यांनी केली आहे. आपण मातृभूमी आणि राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी रक्त सांडण्यास तयार आहोत. जम्मू काश्मीर हा देशाचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे इथे एक ध्वज आणि एक घटनाच मनाली जाईल, असे ते म्हणाले. काश्मिरी लोकांच्या भावना भडकावून मुफ्ती यांनी प्रदेशातील शांतता, सौहार्द धोक्यात आणू नये. अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशाराही त्यांनी दिला.
काँग्रेस प्रवक्ते रवींद्र शर्मा यांनीही मुफ्ती यांच्या विधानाचा समाचार घेतला. अशी विधाने कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह आणि सहन करण्याजोगी नाहीत. ती कमालीची प्रक्षोभक, बेजबाबदार आणि नागरिकांची माने दुखावणारी आहेत, असेही ते म्हणाले.
Comments are closed.