Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीत साहित्य चळवळीला चालना; मराठीचा वारसा अधिक समृद्ध होणार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात विदर्भ साहित्य संघाची कार्यकारिणी स्थापन झाल्याने येथील साहित्य चळवळीला नवसंजीवनी मिळाली आहे. या उपक्रमामुळे स्थानिक लेखक, कवी आणि नवसाहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल, तसेच मराठी भाषा आणि साहित्याचा वारसा अधिक समृद्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी व्यक्त केला.

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात शनिवारी झालेल्या या उद्घाटन सोहळ्यात विदर्भ साहित्य संघाचे केंद्रीय सदस्य डॉ. श्याम मोहरकर, सरचिटणीस विलास मानेकर, साहित्यिक श्याम माधव धोंड, इंद्रजित ओरके, तीर्थराज कापगते, सतीश चिचघरे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. विदर्भ साहित्य संघाच्या योगदानाचा आढावा घेताना अध्यक्ष प्रदीप दाते म्हणाले की, गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही दर्जेदार साहित्य निर्माण होऊ शकते आणि त्यासाठी साहित्य संघ हे योग्य व्यासपीठ ठरेल.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

डॉ. श्याम मोहरकर यांनी विदर्भ साहित्य संघाच्या कार्याचा मागोवा घेत मराठी साहित्याच्या वृद्धीसाठी अशा शाखांची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले. गडचिरोलीत अनेक प्रतिभावान लेखक असून, त्यांना योग्य संधी दिल्यास मराठी साहित्य क्षेत्रात मोठा ठसा उमटवू शकतात, असे ते म्हणाले.

साहित्यिक श्याम माधव धोंड यांनी कवींच्या रचनांच्या माध्यमातून आपल्या भाषणात रसिकांना मंत्रमुग्ध केले. उत्तम साहित्य निर्माण करण्यासाठी सकस वाचन गरजेचे असून, नवसाहित्यिकांनी याकडे विशेष लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर यांनी सांगितले की, या कार्यकारिणीच्या स्थापनेमुळे गडचिरोलीतील साहित्य चळवळीला मोठी चालना मिळेल. स्थानिक लेखक आणि कवींना प्रेरणा मिळेल आणि त्यांच्या कलाकृतींना व्यापक संधी मिळेल.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.