Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिव्यांगांसाठी रोजगाराचे नवे दालन

जिल्हा प्रशासन आणि यूथ 4 जॉब्स फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली:– गडचिरोली जिल्ह्यात दिव्यांग युवक-युवतींच्या कौशल्य विकासासाठी आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. गडचिरोली जिल्हा प्रशासन आणि यूथ 4 जॉब्स फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला असून, या करारावर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व यूथ 4 जॉब्स तर्फे राज्य समन्वयक महेंद्र पाटील यांनी स्वाक्षरी केली.

या कराराअंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांग तरुण-तरुणींना १०० टक्के यूडीआयडी (UDID) कार्ड, विविध क्षेत्रातील मोफत प्रशिक्षण, कौशल्य विकास कार्यक्रम, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी मिळणार आहेत. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभही दिव्यांगांना मिळणार आहे. यामुळे दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी मदत होणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यूथ 4 जॉब्स फाउंडेशन गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात दिव्यांग व्यक्तींशी संबंधित विविध उपक्रम राबवत आहे. गडचिरोलीमध्येही फाउंडेशनचे विशेष प्रशिक्षण केंद्र कार्यरत असून, जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यामुळे या उपक्रमाला अधिक बळ मिळणार आहे.

या कराराबाबत जिल्हाधिकारी  पंडा यांनी सांगितले की, “दिव्यांग युवकांना सक्षम करण्यासाठी हा करार एक मैलाचा दगड ठरेल.” तसेच यूथ 4 जॉब्स फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनाचे आभार मानले आणि अधिकाधिक दिव्यांग युवकांपर्यंत पोहोचण्याचा मनोदय व्यक्त केला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.