ZP अधिकाऱ्यांचा सिरोंचा दौरा; योजनांची थेट पाहणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २३ मे : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सिरोंचा तालुक्याचा दौरा करून विविध योजनांची प्रत्यक्ष पाहणी केली. जलसंपत्ती, आरोग्य, पोषण आणि ग्रामविकास योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेत स्थानिक यंत्रणांना योग्य मार्गदर्शनही करण्यात आले.
२२ मे रोजी झालेल्या या दौऱ्यात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आणि सहायक कार्यकारी अभियंता यांचा समावेश होता. शिष्टमंडळाने सर्वप्रथम तालुक्याच्या टोकावरील मौजा सोमनूर येथील नळ पाणीपुरवठा योजनेची पाहणी केली. यानंतर अंगणवाडी केंद्र व ग्रामपंचायत कार्यालयांना भेट देत शासकीय सेवांची अंमलबजावणी प्रत्यक्ष तपासण्यात आली.
तत्पूर्वी बालमुत्यमपल्ली, अंकिसा आणि आसरअल्ली ग्रामपंचायतींना भेट देऊन स्थानिक अधिकारी व नागरिकांशी संवाद साधण्यात आला. ग्रामविकास, प्राथमिक आरोग्य, जलसंधारण, पोषण अभियान यांसह विविध योजनांबाबत वस्तुनिष्ठ चर्चा करण्यात आली.
या दौऱ्यादरम्यान तहसील कार्यालय, सिरोंचा येथे आयोजित आपत्ती व्यवस्थापन बैठकीत सीईओ सुहास गाडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर तातडीच्या उपाययोजनांसह दीर्घकालीन नियोजनाचे मार्गदर्शन दिले.
दरम्यान, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी पंचायत समितीत ग्रामविकास अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन योजनांची प्रगती, लाभार्थ्यांपर्यंत पोहोच, अडथळे आणि त्यावरील उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला.
या दौऱ्यात गटविकास अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा व बांधकाम विभागाचे उपअभियंते, तालुका आरोग्य अधिकारी, आणि विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रशासनाने थेट स्थळी भेट देऊन केलेली ही तपासणी, योजनांच्या गतीशील अंमलबजावणीसाठी सकारात्मक पाऊल ठरले आहे.
Comments are closed.