इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; ३० पर्यटक वाहून गेले तर सहा मृतदेह हाती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कुंडमळा (ता. मावळ) रविवार, १५ जून : प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जुना लोखंडी पूल अचानक कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, सुमारे ३० पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेले असून, आतापर्यंत सहा मृतदेह सापडले आहेत. त्यापैकी दोघांची ओळख पटली असून, इतरांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. या दुर्घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दुर्घटनेत आतापर्यंत सुमारे ३८ जणांना वाचवण्यात यश आले आहे. यामध्ये सहा जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर पवना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून, घटनास्थळी बचाव कार्याला गती देण्यात आली आहे.
दुहेरी निष्काळजीपणाची किंमत!..
ही घटना तळेगाव दाभाडे शहराच्या सिमेजवळील कुंडमळा येथे दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. रविवारी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची उपस्थिती होती. केवळ पादचाऱ्यांसाठी असलेल्या या जुन्या पुलावर चारचाकी व दुचाक्यांसह सुमारे शंभर जण एकत्र जमले होते. पुलावरच काही पर्यटक थांबले असताना भार सहन न झाल्याने हा ३० वर्षे जुना लोखंडी पूल अचानक कोसळला. पाहता पाहता अनेकजण थेट नदीत पडले. काहीजण प्रवाहात वाहून गेले, तर काहींचा थरकाप उडाला.
बचाव कार्यात मुसळधार पावसाचा अडथळा…
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, ग्रामस्थ, ‘आपदा मित्र’ पथक, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, मागील दोन दिवसांपासून मावळ परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या प्रवाहाला जोर आला आहे. त्यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. दरम्यान, बोटी, दोरखंड आणि ड्रोनच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे.
प्रशासन सतर्क, चौकशीची मागणी…
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तातडीने आपत्कालीन यंत्रणा सक्रिय केल्या आहेत. पिंपरी-चिंचवड, पुणे आणि मुंबईहून अतिरिक्त बचावपथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. पुलाची स्थिती अत्यंत जर्जर असल्याचे स्थानिक नागरिकांनी वारंवार सांगितले होते, मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.
या प्रकरणी तातडीने चौकशी करण्यात यावी, दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिक व सामाजिक संस्थांनी केली आहे. शासनाकडून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचा निर्णय झालेला असून आणि जखमी झालेल्या सर्वांना सरकारकडून उपचार देखील करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली आहे.
(अधिकृत मृतांची संख्या, ओळख, आणि प्रशासनाच्या प्रतिक्रियेबाबत पुढील अपडेट प्रतीक्षेत आहेत.)
Comments are closed.