जिल्ह्यात निनादले ‘वंदे मातरम्’चे सूर
स्वातंत्र्यलढ्याच्या आत्म्याला १५० वर्षांची वंदनांजली...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्वातंत्र्यलढ्याचा आत्मा ठरलेले आणि देशभक्तीची चेतना जागवणारे ‘वंदे मातरम्’ या गीताला आज १५० वर्षे पूर्ण झाली. या ऐतिहासिक दिनानिमित्त संपूर्ण गडचिरोली जिल्हा देशभक्तीच्या ओजाने दुमदुमला. जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, १९७२ शाळा-महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गोंडवाना विद्यापीठ आणि सर्व तहसील कार्यालयांत “वंदे मातरम्”चे सामूहिक गायन मोठ्या उत्साहात पार पडले.
या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यात देशभक्तीची लहर उसळली. सकाळी १०.३० वाजता एकाच वेळी जिल्ह्यातील प्रत्येक शैक्षणिक व प्रशासकीय संस्थांमध्ये एकसुरात “वंदे मातरम्”चे सूर घुमले आणि वातावरण राष्ट्रप्रेमाच्या भावनेने भारावून गेले. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर कवितांचे सादरीकरण, वक्तृत्व व निबंध स्पर्धा तसेच ‘वंदे मातरम्’ गीताच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवरील प्रदर्शनाचे आयोजन करून या गीताला अभिवादन केले. विजेत्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, गडचिरोली येथे जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रम पार पडला. शाळेच्या पटांगणावर विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला अभिवादन करून सामूहिक ‘वंदे मातरम्’चे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी भूषवले. या कार्यक्रमाचे आयोजन औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली यांनी केले होते.

बंकिमचंद्र चटर्जी यांनी ७ नोव्हेंबर १८७५ रोजी रचलेले ‘वंदे मातरम्’ गीत हे केवळ एक गीत नव्हे, तर भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे प्राण बनले. या गीताने असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या हृदयात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित केली. १५० वर्षांनंतरही या गीतातील प्रेरणा, ओज आणि मातृभूमीवरील अभिमान आजही तितकाच तेजस्वी आहे. विद्यार्थ्यांना आजच्या कार्यक्रमातून या गीताचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व समजावून सांगण्यात आले.
या भव्य उपक्रमाचे आयोजन जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, कौशल्य विकास विभाग आणि शाळा व्यवस्थापन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. शिक्षक, विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत “वंदे मातरम्”च्या एकसंध सुरांतून राष्ट्रभक्तीचे दर्शन घडवले.

