वाघांच्या दहशतीने देऊळगाव थरथरले; तातडीची कारवाई नाही तर रस्त्यावर उतरू — डावे पक्ष
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आरमोरी : देऊळगाव, इंजेवारी, किटाळी आणि डोंगरसावंगी परिसरात मागील काही दिवसांपासून वाघ-मानव संघर्ष भयावह वळण घेत असून संपूर्ण परिसर भीतीच्या विळख्यात सापडला आहे. शेतशिवारात आणि गावालगत मुक्त संचार करणाऱ्या वाघांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः कोलमडले आहे. वाढत्या हल्ल्यांच्या मालिकेवर तातडीची कारवाई न झाल्यास देऊळगाव येथे चक्काजाम आंदोलन उभारणार असल्याचा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाने वनविभागाला दिला आहे.
देऊळगावातील मुक्ताबाई नेवारे (७०) आणि अनुसया जिंदर वाघ (७०) या दोन महिलांना सरपणासाठी गेल्यावर गावालगतच वाघाने ठार केले. एकाच गावात सलग दोन मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप आणि थरकापाचे वातावरण आहे.
घटनेनंतर काॅ. अमोल मारकवार (जिल्हा सचिव, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष), भाई रामदास जराते (जिल्हा चिटणीस, शेकाप) आणि भाई अक्षय कोसनकर यांनी देऊळगावात जाऊन कुटुंबीयांना भेट देऊन सांत्वन केले व प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार परिसरात ८ ते १० वाघ आणि बिबट्यांचा सतत मुक्त संचार सुरू आहे. शेतात जाणे, सरपणासाठी बाहेर पडणे, अगदी संध्याकाळनंतर घराबाहेर हालचाल करणेही धोक्याचे झाले आहे. शेतकरी, महिला आणि वृद्धांमध्ये तीव्र दहशत असून गावातील कामकाज ठप्प झाले आहे.
वनविभागाकडून ठोस उपाययोजना न झाल्याची तीव्र नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यामुळे “तातडीने बंदोबस्त करा; अन्यथा डाव्या पक्षांच्या नेतृत्वाखाली देऊळगावात तीव्र चक्काजाम आंदोलन छेडले जाईल” असा कठोर इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व शेतकरी कामगार पक्षाने दिला आहे.

