‘कॅन्सर व्हॅन आपल्या दारी’ — गडचिरोलीत कर्करोग तपासणीचा महाअभियान
२२ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात व्यापक जनजागृती मोहीम..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि.२१ : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात कर्करोग तपासणी आणि जनजागृतीसाठी ‘कॅन्सर व्हॅन आपल्या दारी’ हा व्यापक उपक्रम २२ नोव्हेंबर २०२५ ते ८ जानेवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात नागरिकांना मुख, स्तन आणि गर्भाशय मुख कर्करोगाची प्राथमिक तपासणी विनामूल्य उपलब्ध होणार आहे.
कर्करोगाचे लवकर निदान हे उपचारातील सर्वात महत्त्वाचे पाऊल असल्याने, ३० वर्षांवरील सर्व महिला व पुरुषांनी या तपासणीचा लाभ घ्यावा, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
तोंडात दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ जखम न बरी होणे, पांढरे–लाल चट्टे दिसणे, तोंड उघडताना त्रास होणे, महिलांमध्ये अनियमित रक्तस्त्राव, स्तनात गाठ जाणवणे किंवा आकारात बदल अशा लक्षणांचे कर्करोगाचे संकेत म्हणून दुर्लक्ष न करता तपासणी करणे आवश्यक असल्याचेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
कॅन्सर व्हॅनचे तालुकानिहाय वेळापत्रक
गडचिरोली : २२ ते २७ नोव्हेंबर
चामोर्शी : २८ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर
मुलचेरा : १० ते १३ डिसेंबर
एटापल्ली : १५ ते १७ डिसेंबर
भामरागड : १८ ते २० डिसेंबर
अहेरी : २२ ते २४ डिसेंबर
सिरोंचा : २५ ते २७ डिसेंबर
धानोरा : २९ डिसेंबर ते १ जानेवारी
कोरची : २ व ८ जानेवारी
कुरखेडा : ३ ते ७ जानेवारी
या कालावधीत व्हॅन संबंधित तालुक्यातील गावांना भेट देऊन जागृती, तपासणी आणि आवश्यक असल्यास संदर्भित उपचार प्रक्रिया पूर्ण करणार आहे.
या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतिशकुमार सोलंके आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमित साळवे यांनी जिल्ह्यातील नागरिकांनी कर्करोगाचा धोका लवकर ओळखण्यासाठी तपासणी करणे अत्यावश्यक असल्याचे सांगून या मोहिमेत सक्रिय सहभागाची विनंती केली.
या मोहिमेमुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत कर्करोग तपासणीची सुविधा घरापर्यंत पोहोचणार असून कर्करोगावरील प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेत जिल्हा एक महत्त्वाचे पाऊल उचलत आहे.

