गोंडवाना विद्यापीठात ‘कमवा व शिका’ विद्यार्थ्यांसाठी सक्षम शिक्षक प्रशिक्षण : प्राथमिक शिक्षणात नवे मानदंड उभारण्याचा संकल्प
गोंडवाना विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन ....
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली दि, २ : गोंडवाना विद्यापीठात विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने कमवा व शिका योजनेंतर्गत पदव्युत्तर शैक्षणिक विभागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा संपर्क हा उपक्रम राबविण्यात येणार असून सदर कार्यशाळेचे आयोजन संचालक, विद्यार्थी विकास विभाग,डॉ. प्रिया गेडाम, सहसमन्वयक डॉ. सविता गोविंदवार, मराठी विभाग प्रमुख यांनी केले. कमवा व शिका योजनेंतर्गत हा उपक्रम राबविण्याकरिता विद्यापीठाने जिल्हा परिषद, गडचिरोली येथून गडचिरोली ब्लॉकमधील प्राथमिक शाळेतील रिक्त विषयशिक्षकांची यादी मागविली.
जानेवारी महिन्यापासून आवश्यकता असेल तेथे गोंडवाना विद्यापीठात पदव्युत्तर शैक्षणिक विभागातील कमवा व शिका योजनेचा लाभ घेणारे विद्यार्थी अध्यापनाकरिता शाळांमध्ये जातील, असे नियोजन केलेले आहे. प्राथमिक शाळेतील विद्यार्थांना शिकवण्यासाठी मराठी, इंग्रजी, गणित व विज्ञान (परिसर अभ्यास) विषयाची अध्यापन कौशल्ये अवगत व्हावी या दृष्टीने दिनांक २६ ते २९ नोव्हेंबर २०२५ या काळात विद्यार्थी-शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेत एकूण ४२ विद्यार्थी-शिक्षक सहभागी झाले. दि. २६ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मधील प्राथमिक शिक्षणासंबंधीची माहिती तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून पदव्युत्तर शैक्षणिक वाणिज्य विभागातील सहायक प्राध्यापक, डॉ. देवदत्त तारे यांनी दिली. दि. २७ नोव्हेंबरला तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून गणित विषयाची अध्यापन कौशल्ये ग्रीनलॅन्ड इंग्लिश मिडीअम शाळा, आलापल्ली येथील शिक्षक विकास आचेवार व इंग्रजी विषयाची अध्यापन कौशल्ये कोरची तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोटराच्या मुख्याध्यापिका वर्षा चुधरी यांनी शिकविली.
२८ नोव्हेंबर रोजी मराठी विषयासाठी सावित्रीबाई फुले, नगरपरिषद शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या चिलमवार यांना आमंत्रित करण्यात आले होते. पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभागाच्या प्रमुख डॉ. सविता गोविंदवार यांनी सुक्ष्म अध्यापन कौशल्ये व बालमानसशास्त्र या विषयावर विद्यार्थी-शिक्षकांना मार्गदर्शन केले. विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागाच्या एकूण ४१ विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. औपचारिक गोष्टींमध्ये न अडकता नवनवीन खेळांच्या व उपक्रमांच्या आधारे उत्साहवर्धक वातावरणात ही कार्यशाळा घेण्यात आली. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी सूरज गेडाम, धनश्री गिरडकर यांनी सहकार्य केले.
हे देखील वाचा,

