अहेरीच्या मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीसाठी भाजपचे चक्काजाम आंदोलन
आलापल्ली सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्याकडून तीन दिवसांत काम सुरू करण्याचे आश्वासन...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी : शहरातील दोन किलोमीटर लांबीचा मुख्य रस्ता खड्डेमय असून अपूर्ण अवस्थेत असल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी अहेरीच्या मुख्य चौकात चक्काजाम आंदोलन केले. जवळपास दीड तास वाहतूक खोळंबल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आलापल्ली उपविभागाचे कार्यकारी अभियंता रोहित रव्वा यांनी तीन दिवसांत रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले.
अहेरी शहराच्या मध्यवर्ती चौकातून जाणाऱ्या या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सतत होणारे अपघात, धुळीमुळे व्यापारी वर्गाचे नुकसान आणि वाहतुकीतील अडथळे यामुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करत आंदोलन छेडले.
आंदोलनादरम्यान भाजपचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या दुरुस्तीत होत असलेल्या विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली. रस्ता तात्काळ दुरुस्त करून काम पूर्णत्वास न्यावे, अशी मागणी करण्यात आली.
चक्काजामदरम्यान घटनास्थळी पोहोचलेल्या कार्यकारी अभियंता रोहित रव्वा यांनी परिस्थितीची पाहणी करून रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक ती कारवाई तीन दिवसांत केली जाईल, असे सांगितले. तसेच रस्त्याचे १०० टक्के काम पूर्ण केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
आंदोलकांनी हे आश्वासन मान्य करत आंदोलन मागे घेतले. दरम्यान, रस्त्याच्या दुरुस्तीला खरेच गती मिळते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

