Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कर्तव्य बजावताना कोरोनाने मृत्यू झालेल्या आणखी ४ ग्रामीण कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत – ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ

आतापर्यंत २२ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. १७ डिसेंबर : कर्तव्य बजावताना कोरोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यू झालेल्या ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीच्या विविध पदावरील आणखी ४ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची विमा रक्कम अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला असून संबंधीत कर्मचाऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी आज दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आतापर्यंत कर्तव्य बजावताना कोरोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यू झालेल्या २२ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत देण्यात आली असल्याचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, कोरोना संकटकाळात ग्रामीण पातळीवरील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्त्या, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, सीएससी कंपनीचे केंद्र चालक, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत कंत्राटी पद्धतीवरील कर्मचारी, कामगार, जिल्हा परिषद कर्मचारी यांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले होते. हे सर्व कर्मचारी कोरोना संकटकाळात ग्रामीण भागातील संक्रमण रोखण्यासाठी जीवाची बाजी लावून काम करत होते. लोकांमध्ये जावून जनजागृती करत होते. माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानाची अंमलबजावणी करण्यामध्ये या कर्मचाऱ्यांनी महत्वाचे योगदान दिले. गृहभेटी करणे, ऑक्सीमीटर, थर्मामीटर आदींच्या सहाय्याने लोकांची तपासणी करणे अशी विविध कामे करताना कर्तव्यावर असताना दुर्दैवाने काही अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाला. अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदत देण्यात येत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

प्राप्त प्रस्तावांपैकी आज रघुनाथ वाटेगांवकर, ग्रामसेवक (खरातवाडी, जि. सांगली), अशोक भोसले, ग्रामविकास अधिकारी (वाठार तर्फ वडगाव, जि. कोल्हापूर), मजिद शेख, ग्रामपंचायत कर्मचारी (डिगडोह देवी, जि. नागपूर), अंबादास ठाणगे, कनिष्ठ सहायक लिपीक (अहमदनगर जिल्हा परिषद) या मृत्यू झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपये विमा कवच मदत देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

घरातील कमावती व्यक्ती गमावल्याने संकटात सापडलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या संकटकाळात मदत देण्याचा हा प्रयत्न आहे. कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ईतर अधिकारी, कर्मचारी यांच्या वारसांना विमा कवच मदत मिळण्यासाठीचे प्रस्ताव लवकर पाठविण्याच्या सूचना जिल्हा परिषदांना देण्यात आल्या असल्याचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

Comments are closed.