“फक्त सोन्याच्या अंगठी-चैनसाठी निर्घृण खून; अहेरी पोलिसांचा घाव—आरोपी गजाआड, ७ दिवसांची पोलीस कोठडी”
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ओमप्रकाश चुनारकर,
अहेरी : आलापल्ली–सिरोंचा महामार्गालगत नागमाता मंदिराजवळील महामार्गावर निर्जन जंगल परिसरात घडलेला रविंद्र तंगडपल्लीवार यांच्या निर्घृण हत्येचा तपास लावत अहेरी पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला अटक करून गडचिरोली पोलिसांच्या कार्यक्षमतेचा ठोस बाणा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.
मौजा नागेपल्ली येथील रविंद्र तंगडपल्लीवार (वय ५०) यांची केवळ हातातील सोन्याची अंगठी आणि गळ्यातील सोन्याच्या चैनसाठी, अतिशय अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले असून, या प्रकरणी समय्या मलय्या सुंकरी (वय ३५, रा. मद्दीगुडम, ता. अहेरी) याला अटक करण्यात आली आहे.
१८ जानेवारी रोजी “आरडीचे पैसे भरण्यासाठी आलापल्लीला जातो” असे सांगून घराबाहेर पडलेले रविंद्र तंगडपल्लीवार संध्याकाळपर्यंत परत न आल्याने कुटुंबीयांनी अहेरी पोलीस ठाण्यात बेपत्ता तक्रार दाखल केली. दुसऱ्याच दिवशी सकाळी नागमाता मंदिराजवळील जंगलात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. डोके, मान आणि चेहऱ्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करून, प्रतिकार केल्याने बोटे मोडेपर्यंत क्रूर मारहाण करण्यात आल्याचे दृश्य पाहून तपास अधिकाऱ्यांनाही हादरवून सोडले.
ओळख, आमिष आणि निर्जन जागेचा कट…
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने ओळखीचा फायदा घेत ‘आरडी व्यवसायाबाबत दोन-तीन आरडी (बचत खाते) देतो’ या आमिषाने रविंद्र तंगडपल्लीवार यांना मुद्दूमाडगू या गावी बोलावले. पुढे त्यांना सिरोंचा महामार्गावरील नागमाता मंदिराजवळील निर्जन जागी नेऊन मागून वार करत हत्या करण्यात आली. हा गुन्हा क्षणिक आवेशाचा नसून, पूर्वनियोजित, थंड डोक्याने रचलेला कट असल्याचे तपासातून स्पष्ट होत आहे.

पोलिसांचा बाणा : तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि जलद कारवाई…
या निर्घृण खून प्रकरणात अहेरी पोलिसांनी दाखवलेली तपासातील शिस्त, तांत्रिक कौशल्य आणि निर्णयक्षम नेतृत्व विशेष उल्लेखनीय ठरले आहे. पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मदीरा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांनी थेट घटनास्थळी भेट दिली त्यानंतर घटनेची गंभीरता लक्षात घेता अहेरी पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना तपशीलवार तपास करण्याचे स्वतः च्याच मार्गदर्शनाखाली तातडीने विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. केवळ संशयावर नव्हे, तर तांत्रिक विश्लेषण, कॉल डिटेल रेकॉर्ड्स, आरोपीच्या हालचालींचा कालानुक्रमिक मागोवा आणि विश्वासार्ह गोपनीय माहिती यांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्यात आली.

या शिस्तबद्ध आणि वैज्ञानिक तपासातून पोलिसांनी काहीच दिवसांत आरोपीपर्यंत पोहोचत गुन्ह्याचा छडा लावला. सखोल चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर २० जानेवारी रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर २१ जानेवारी रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी (PCR) मंजूर झाली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षल आकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.
विशेष म्हणजे, पोलीस निरीक्षक हर्षल आकरे यांनी अहेरीत पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या, टोळक्यांमध्ये सक्रिय असलेल्या आणि समाजात अस्थिरता निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींवर सातत्याने करडी नजर ठेवत ठोस कारवाया केल्या आहेत. त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी केलेल्या कारवायांमुळे पोलिसांचा धाक आणि कायद्याचा दरारा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
अहेरी तालुका हा मध्यवर्ती व संवेदनशील भाग ठरत असून, तेलंगणा व छत्तीसगड या दोन राज्यांच्या सीमेला लागून असल्याने येथे अवैध दारू तस्करी, बेकायदेशीर वाहतूक, तसेच सीमावर्ती गुन्हेगारी प्रवृत्ती सक्रिय राहण्याची शक्यता अधिक असते. मात्र, अशा बेकायदेशीर हालचालींवर पोलिसांनी ठेवलेली कठोर नजर आणि वेळोवेळी केलेल्या कारवायांमुळे अनेक गुन्हेगारी टोळ्यांचे मनसुबे उधळले गेले आहेत.
या पार्श्वभूमीवर, दारू तस्करी, अवैध विक्री आणि सीमावर्ती गुन्हेगारीविरोधात आणखी कडक व सातत्यपूर्ण कारवाई व्हावी, अशी मागणी समाजमाध्यमांतून नागरिकांकडून जोर धरताना दिसत आहे. पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता आणि कार्यक्षमता पाहता, कायद्याच्या चौकटीत राहून समाजहितासाठी कठोर पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
समाजाचा संताप : ‘अशा मानसिकतेला कठोरात कठोर शिक्षा द्या’..
या घटनेने गडचिरोली जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. “प्रामाणिक, प्रेमळ, कुठलाही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेला माणूस केवळ दागिन्यांसाठी संपवला गेला—ही समाजाच्या माणुसकीवर थेट हल्ला आहे,” अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. आरोपीच्या अमानुषतेमुळे कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, केवळ कायद्याच्या चौकटीत नव्हे तर समाजाला धडा देणारी शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे.
हत्येनंतरचा शोककळा आणि दुर्दैवी अपघात…
रविंद्र तंगडपल्लीवार यांच्या निर्घृण हत्येच्या धक्क्यातून कुटुंब सावरत असतानाच, नियतीने त्यांच्यावर आणखी एक क्रूर आघात केला. अंत्यसंस्कार आटोपून परतीच्या प्रवासात असताना कुटुंबीयांची कार अचानक नियंत्रण सुटून नदीत कोसळली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, तर तिघेजण गंभीर जखमी झाले. काही तासांपूर्वीच घरातील कर्त्या पुरुषाच्या हत्येचे दु:ख पचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुटुंबावर, पुन्हा मृत्यूचे सावट कोसळले.
एका बाजूला खुनामुळे उद्ध्वस्त झालेले घर, तर दुसऱ्या बाजूला अपघाताने हिरावलेले जीव—या दुहेरी आघाताने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. शोक व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडत असून, गावात प्रत्येक चेहऱ्यावर हतबलता आणि संताप दोन्ही भाव स्पष्ट दिसत आहेत. “एका कुटुंबावर इतके दु:ख एकाच वेळी कसे कोसळू शकते?” असा प्रश्न नागरिकांच्या मनात घर करून राहिला आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला असून, कुटुंबावर कोसळलेल्या दु:खाच्या डोंगरापुढे समाजही निशब्द झाला आहे. प्रशासनाने जखमींवर तातडीने उपचार सुरू केले असले, तरी या अपघाताने निर्माण झालेली मानसिक जखम भरून न येणारी असल्याचे चित्र आहे.

