Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“गडचिरोली–असरअली बस सेवा ‘राम भरोसे’; चालक-कंडक्टर गायब, प्रवाशांचा संताप उसळला!”

वेळेचा ठावठिकाणा नाही, दोन दिवसांपासून सेवा ठप्प; प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह....

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : जिल्ह्याच्या दुर्गम भागाला जोडणारी अत्यावश्यक गडचिरोली–असरअली बस सेवा सध्या अक्षरशः ‘राम भरोसे’ सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. एप्रिल ८ पासून पुन्हा सुरू करण्यात आलेली ही सेवा अवघ्या काही दिवसांतच विस्कळीत झाली असून, गेल्या दोन दिवसांपासून चालक आणि कंडक्टर कामावर हजर नसल्यामुळे बस पूर्णपणे बंद पडली आहे. परिणामी, सकाळी साडेनऊ वाजता बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांचा बसस्थानकावर प्रचंड खोळंबा झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सकाळी ठरलेल्या वेळेनुसार बस सुटण्याची अपेक्षा असताना प्रवासी तासन्तास प्रतीक्षा करत बसले; मात्र बसच न आल्याने संताप व्यक्त करण्यात आला. चौकशी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चालक व कंडक्टर दोघेही संपर्काबाहेर असून, त्यांनी दोन दिवसांपासून कामावर हजेरी लावलेली नाही. फोन बंद असल्यामुळे त्यांच्याशी संपर्कही होऊ शकलेला नाही. अशा परिस्थितीत पर्यायी व्यवस्था करण्याचे कोणतेही प्रयत्न प्रशासनाने केले नसल्याचे उघड झाले आहे.

विशेष म्हणजे, ही बस सेवा यापूर्वी अनेक महिन्यांपासून बंद होती. रस्त्याचे काम प्रगतीपथावर आल्याने आणि स्थानिक नागरिकांच्या मागणीनंतर अखेर एप्रिलमध्ये सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, सुरुवातीपासूनच या सेवेचा कारभार ढिसाळ राहिला. ठरलेल्या वेळेनुसार बस कधीच न सुटता कधी ११ तर कधी १२ वाजता रवाना होत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जिल्हा मुख्यालय गडचिरोली ते सिरोंचा तालुक्यातील असरअली या मार्गावर ही एकमेव बस सेवा असल्यामुळे नागरिक पूर्णपणे या व्यवस्थेवर अवलंबून आहेत. मात्र, महामंडळाच्या दुर्लक्षामुळे ही सेवा वारंवार खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांपासून रुग्णांपर्यंत सर्वच प्रवासी त्रस्त झाले आहेत.

या प्रकारामुळे बसस्थानक प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. चालक-कंडक्टर अनुपस्थित असताना पर्यायी व्यवस्था का करण्यात आली नाही? प्रवाशांच्या अडचणींचा विचार का केला गेला नाही? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्यापही अनुत्तरित आहेत.

गडचिरोली बस स्थानकाचा फोन सतत ‘आऊट ऑफ ऑर्डर’! प्रवाशांचा संताप

गडचिरोली बस स्थानकाचा संपर्क क्रमांक गेल्या अनेक दिवसांपासून सतत ‘आऊट ऑफ ऑर्डर’ येत असल्याची तक्रार प्रवाशांकडून होत आहे. त्यामुळे बस वेळापत्रक, आगमन-निर्गमन याबाबत माहिती मिळवण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

प्रवाशांनी अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेषतः ग्रामीण भागातील प्रवाशांना याचा अधिक फटका बसत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.