Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सोशल मीडियावरील आरोप खोटे – धनंजय मुंडे

Get real time updates directly on you device, subscribe now.

समाज माध्यमांमध्ये माझ्या विरुध्द होणारे आरोप पूर्णपणे खोटे बदनामी आणि ब्लॅकमेल करणारे आहेत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क: सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. सदर तरुणीने मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याची माहिती देखील समोर आली आहे. पोलिसांनी तिच्या तक्रारीची देखील घेतली नसल्याचे देखील तिने ट्वीट केले आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

धनंजय मुंडे यांचे फेसबुकवर चे स्पष्टीकरण

कालपासून समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया व सोशल मिडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. सदर प्रकरणी रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने (या रेणु शर्मा या करुणा शर्मा यांच्या सख्या लहान बहीण आहेत) स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो . हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे असून या प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती खालील प्रमाणे आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे.

सदर करुणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे.

मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे, मी त्यांना विमा पॉलिसी व त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सदभावनेने केलेल्या आहेत.

मात्र 2019 पासून करूणा शर्मा त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जिवीतीला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता.

या बाबत दि. 12 नोव्हेंबर 2020 रोजी मे 2019 पासून घडत असलेल्या या सर्व बाबींसंदर्भात पोलीसांकडे तक्रार सुद्धा देण्यात आलेली आहे.

नोव्हेंबर 2020 मध्ये श्रीमती करुणा शर्मा यांनी समाज माध्यामावर माझी बदनामी करण्याच्या हेतुने व मला ब्लॅकमेल करण्याच्या हेतुने माझ्याशी संबंधित अगदी व्यक्तिगत व खाजगी साहित्य प्रकाशीत केले होते. त्यामुळे सदर प्रकरणी मी स्वतः हून न्याय मिळवण्यासाठी मा. उच्च न्यायालयात श्रीमती करुणा शर्मा विरुद्ध याचिका दाखल केली आहे.

सदर याचिकेत मा. उच्च न्यायालयाने श्रीमती करुणा शर्मा यांच्या विरोधात असे साहित्य प्रकाशित करण्यास प्रतिबंध करणारे आदेश पारित केले आहेत. सदरची याचिका पुढील आणखी सुनावण्यासाठी मा. उच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे. आणि त्याच दरम्यान दोन्ही बाजूच्या वकिलांमार्फत समेट/ समझोता घडवून आणण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. या संदर्भात श्रीमती करुणा शर्मा यांच्याविरोधात आम्ही स्वतः उच्च न्यायालयात गेलेलो आहोत आणि या सर्व बाबी मा. उच्च न्यायालयाच्या विचाराधीन असल्यामुळे मी अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही. माझी या संदर्भात प्रसार माध्यमांना देखील विनंती आहे की या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रियेवर परिणाम होईल म्हणून अधिक भाष्य टाळावे अशी विनंती आहे.

तथापि कालपासून रेणू शर्मा ज्या या करुणा शर्मा यांच्या भगिनी आहेत यांनी माझ्या विरुद्ध खोटे आणि बदनामीकारक व माझ्यावर लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप केल्याची पोस्ट प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे तसेच त्यांनी या संदर्भात विविध प्राधिका-यांकडे केलेल्या तक्रारीच्या प्रति देखील समाज माध्यमातून प्रसारित केल्या आहेत. या सर्व तक्रारी खोट्या आहेत, व श्रीमती करुणा शर्मा, त्यांची बहीण रेणू शर्मा व त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा यांच्या मला ब्लॅकमेल करणे व माझ्या कडून खंडणी वसूल करण्याच्याच योजनेचा एक भाग आहे.

माझ्याकडे श्रीमती रेणू शर्मा यांनी त्यांच्या मोबाईल वरून मला ब्लॅंकमेलिंग करण्यासाठी कोट्यवधी रुपये मागितल्याचे sms रुपी पुरावे आहेत. तसेच मी मा. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये श्रीमती करुणा शर्मा यांच्या सोयीने प्रकरण सेटल करावे या साठीच्या दबाव तंत्रासाठीचा सुद्धा हा भाग असू शकतो.

मला खात्री आहे की या सर्व प्रकरणाची संबंधीतांकडून सुयोग्य चौकशी केली जाईल तथापी माझी आपल्याला विनंती आहे की सदर प्रकरणी वृत्त प्रसिद्ध करताना वरील वस्तुस्थिती लक्षात घ्यावी कारण सदर प्रकरणी श्रीमती करूना शर्मा यांच्या विरोधात दावा प्रलंबित आहे. तसेच या प्रकरणी 2 अज्ञान बालकांचा सुद्धा समावेश आहे.

हे संपूर्ण प्रकरण हे ब्लॅकमेलिंग करणारे, खोटे व बदनामी करण्याच्या हेतूने घडवून आणण्यात आलेले आहे, त्यामुळे यात अशा आरोपांवर विश्वास ठेवू नये ही विनंती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.